Pune Suger Factory Politics: साखर कारखानदारीत १८५ कोटींचा 'एफआरपी' घोटाळा; विठ्ठल राजे पवारांचा गंभीर आरोप
शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार एम.एस. फाऊंडेशन आणि शेतकरी संघटना महासंघाने याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि सहकार मंत्र्यांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. संघटनेने पुराव्यासह सादर केलेल्या तक्रारीत खालील धक्कादायक बाबी नमूद केल्या आहेत.
शेतकऱ्यांना १८५ कोटी रुपयांपेक्षा जास्त एफआरपी रक्कम देण्यात आलेली नाही. विनापरवाना (परवानगीशिवाय) लाखो मेट्रिक टन उसाचे बेकायदेशीर गाळप करण्यात आले. शासन आणि साखर आयुक्तालयाला दिशाभूल करणारे बनावट अहवाल सादर करून फसवणूक केली वजन, रिकव्हरी आणि एनडीसी (NCDC) कर्जाच्या विनियोगात मोठी अनियमितता आढळली आहे.असेही त्यांनी नमूद केले.
या घोटाळ्यासाठी हर्षवर्धन पाटील (चेअरमन, इंदापूर कारखाना), बाबू बोत्रे पाटील (ओंकार शुगर ग्रुप), कल्याण काळे आणि दत्ता बी. शिंदे यांना जबाबदार धरण्यात आले असून, त्यांच्यावर IPC ४२० (फसवणूक), ४१९ (बनावट ओळख), आणि १२०(B) (संगनमत) यांसारख्या गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर दोषींवर तात्काळ कारवाई झाली नाही आणि कारखान्यांची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांची देणी भागवली गेली नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात राज्यव्यापी तीव्र आंदोलन केले जाईल. यामध्ये अन्नधान्य व भाजीपाला पुरवठा बंद करण्यासोबतच ‘सत्याग्रह’ करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.






