विद्यार्थिनींनो, आता चालत नाही तर सायकलवर शाळेत जायचं; पुणे जिल्हा परिषदेचा 'हा' प्लॅन ठरेल फायद्याचा (फोटो सौजन्य : Freepik)
पुणे : मुलींचे शालेय शिक्षण व्हावे. तसेच त्यांची शाळेमधील उपस्थिती वाढावी. घर ते शाळा हे अंतर लांब असल्याने अनेकदा शाळेमध्ये येण्यासाठी उशीर होतो म्हणून काही मुली शाळेत येण्याचे टाळतात. त्यामुळे त्यांना सायकल उपलब्ध करून देण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने घेतला आहे. यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून परिषदेमार्फत सायकल बँक उभारण्यात येणार आहे.
याबाबत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘जिल्हा परिषदेने सायकल बँक उभी करण्यात निर्णय घेतला असून, याद्वारे जिल्हा परिषदेच्या शाळेतील पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थिनींना आठवीचे शिक्षण पूर्ण करेपर्यंत मोफत सायकल दिली जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून ही योजना सुरू केली जाणार आहे’.
जिल्हा परिषद सायकल बँक स्थापन करणार आहे. यामध्ये जमवणाऱ्या सायकली या पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिल्या जातील. जोपर्यंत त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत आहे, तोपर्यंत या सायकली त्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी घरी दिल्या जातील. आठवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ही सायकल त्यांना पुन्हा संबंधित शाळेच्या सायकल बँकेत जमा करावी लागणार आहे.
हेदेखील वाचा : Waqf Amendment Bill : वक्फचे व्यवस्थापन आता सरकारच्या हातात; AIMPLB चे थेट आव्हान, “जर विधेयक मंजूर झाले तर देशव्यापी आंदोलन”
आजमितीला जिल्हा परिषदेच्या पाचवी ते आठवी या वर्गामध्ये शिकणाऱ्या मुलींची संख्या सुमारे 32 ते 35 हजारापर्यंत आहे. तेवढ्या प्रमाणात सायकली सायकल बँकेमध्ये उपलब्ध करून दिल्या जातील. प्रामुख्याने सीएसआर त्याचबरोबर आवश्यकता भासल्यास काही प्रमाणात जिल्हा निधी यासाठी खर्च केला जाईल. या सर्व सायकली या जिल्हा परिषदेच्या असतील. शाळेमार्फत त्या विद्यार्थिनींना दिल्या जातील. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा उपक्रम सुरू केला जाणार असल्याचे गजानन पाटील यांनी सांगितले.