सौजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील वाहतूककोंडीचा प्रश्न आता कायमस्वरूपी सुटण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. रेल्वेफाटकमुक्त पीएमआरडीए क्षेत्राचे स्वप्न साकारण्यासाठी प्राधिकरणाने ‘महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.’ (महारेल) सोबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे पीएमआरडीए क्षेत्रातील रखडलेले उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचे प्रकल्प आता युद्धपातळीवर पूर्ण होणार आहेत.
मुख्यमंत्री फडणवीसांच्या आग्रही पुढाकारातून मार्ग
पुणे परिसरातील वाढती वाहतूककोंडी लक्षात घेता, रेल्वेफाटकांवर होणारी वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री तथा पीएमआरडीएचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी विशेष पुढाकार घेतला होता. विविध यंत्रणांमध्ये काम विखुरलेले न ठेवता, रेल्वे प्रकल्पांचा तांत्रिक अनुभव असलेल्या ‘महारेल’मार्फतच ही सर्व कामे करून घ्यावीत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले होते. याच धोरणात्मक निर्णयामुळे या प्रकल्पांना आता वेग आला आहे.
कराराचे मुख्य पैलू:
स्वाक्षरी : पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आणि महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वाल यांनी या करारावर अधिकृत स्वाक्षऱ्या केल्या.
वेळेची व इंधनाची बचत : या करारामुळे रेल्वे फाटकांवर होणारी वाहतुकीची कोंडी संपुष्टात येणार असून, नागरिकांचा बहुमोल वेळ आणि इंधनाची मोठी बचत होणार आहे.
प्रशासकीय गती : या कामांचे नियोजन आणि अंमलबजावणी आता महारेलच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली होणार असल्याने कामांचा दर्जा सुधारून ते वेळेत पूर्ण होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या करारामुळे पुणे महानगर प्रदेशाच्या विकासाला अधिक गती मिळणार असून, रेल्वे फाटकांमुळे होणारी अडवणूक लवकरच इतिहासजमा होणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रसंगी पीएमआरडीएचे मुख्य अभियंता (प्रभारी) शिवप्रसाद बागडी यांच्यासह दोन्ही संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.






