संग्रहित फोटो
भोर : राज्यासह देशभरात अत्याच्याराच्या घटना वाढल्या असून, अशातच आता एक संतापजनक बातमी समोर आली आहे. भोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात बोलावून अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ती नराधमाच्या तावडीतून सुदैवाने बचावली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अविनाश रवींद्र गायकवाड (वय ३४) याला शिरवळ येथून अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शुक्रवार (दि.३) रोजी शाळा सुटल्यानंतर घरी जात होती. या दरम्यान आरोपी अविनाश गायकवाड याने तिला गाठले आणि “तुझे वडील आमच्या घरी बसले आहेत,” अशी बतावणी करून तिला विश्वासात घेऊन आपल्या घरात बोलावले. घरात नेल्यानंतर त्याने मुलीला जबरदस्तीने विवस्त्र करुन बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र संकटात सापडलेल्या मुलीने घाबरून न जाता समयसूचकता दाखवली. तिने आरोपीला “मी किचनमधून पाणी पिऊन येते,” असे सांगून वेळ मारून नेली आणि किचनच्या दरवाज्यातून पळ काढला. या धाडसामुळे ती नराधमाच्या तावडीतून सुखरूप बाहेर पडली.
या घटनेनंतर पीडित मुलीच्या आईने बुधवार (दि. १५) रोजी भोर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपीचा शोध सुरू केला आणि त्याला शिरवळ येथून ताब्यात घेतले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शीला खोत करत आहेत. या घटनेबाबत भोर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नीलेश माने म्हणाले की, “ही घटना अत्यंत संतापजनक आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी आमचे पथक सतर्क आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले जात असून, त्यांना ‘गुड टच आणि बॅड टच’बाबत सविस्तर माहिती दिली जात आहे. पालकांनीही आपल्या पाल्यांशी संवाद साधावा.
चॉकलेटच्या बहाण्याने 15 वर्षीय मुलीवर अत्याचार
लातूर जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुखेड तालुक्यातील १५ वर्षीय मुलीवर चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १० जुलै रोजी सकाळी साडेसात ते साडेनऊच्या दरम्यान घडली आहे.






