विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र राज्य तर्फे आयोजित दोन दिवसीय ‘नवसमाजमाध्यम संवाद व सृजनशीलता शिबिर’ अहिल्यानगर येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात ११ आणि १२ जुलै २०२६ रोजी अत्यंत उत्साहात आणि गजबजलेल्या वातावरणात संपन्न झाले. आजच्या डिजिटल युगात लोकशाही मूल्यांची जपणूक करण्यासाठी आणि शोषित-वंचितांचा आवाज बुलंद करण्यासाठी नवसमाजमाध्यमांचा प्रभावी आणि सृजनशील वापर कसा करावा, यावर या शिबिरात सखोल मंथन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार मा. मुक्ता कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सिद्धार्थ जगदेव उपस्थित होते. दोन दिवस चाललेल्या या शिबिरात राज्यभरातून शेकडो तरुण, सामाजिक कार्यकर्ते, आणि अभ्यासक सहभागी झाले होते.
पहिले सत्र: अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि समाजमाध्यमांचे वास्तव
शिबिराच्या पहिल्या दिवशी उद्घाटन सत्रानंतर मुख्य चर्चासत्रांना सुरुवात झाली. पहिल्या दिवशी प्रामुख्याने ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नवसमाजमाध्यम’, ‘राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व्हिडिओ आणि दृकशाव्य पॉडकास्ट’, तसेच ‘समाज माध्यमांवरील जातधर्म द्वेष्टे लेखन आणि त्याला पर्याय’ या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर संवाद साधला गेला.
या सत्रांचे नेतृत्व करताना मा. निरंजन टकले यांनी मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांच्या मर्यादा स्पष्ट करत सोशल मीडिया कशाप्रकारे सामान्यांचे हत्यार बनू शकते, यावर प्रकाश टाकला. डॉ. जालिंदर धिगे, मा. रवींद्र पोखरकर, मा. साहिल रज्जाक मुल्ला, मा. पैगंबर शेख आणि मा. विजय मांडके यांनी आपल्या व्याख्यानातून व्हिडिओ एडिटिंग, पॉडकास्ट निर्मिती आणि फेक न्यूज कशी ओळखावी, याचे तांत्रिक व वैचारिक पैलू शिबिरार्थींसमोर मांडले.
दुसरे सत्र: प्रस्थापित माध्यमे विरुद्ध नवमाध्यमे आणि रणनीती
शिबिराच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात ‘राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक पोस्ट्स लेखन’ आणि ‘प्रस्थापित प्रसार माध्यमे विरुद्ध नवसमाजमाध्यमे’ या विषयावर धारदार चर्चा झाली. यावेळी बोलताना मा. आनंद शितोळे, मा. शिवराम ठावरे आणि मा. हनुमंत पवार यांनी सोप्या आणि प्रभावी भाषेत सोशल मीडियासाठी लेखन कसे करावे, याचे कसब शिकवले. तर प्रा.डॉ. बापू चंदनशिवे, मा. युवराज मोहिते आणि मा. प्रविण शिंदे यांनी सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत बहुजन प्रतिगामी शक्तींच्या विरोधात पुरोगामी विचारांचा प्रचार करण्यासाठी डिजिटल स्पेसचा वापर कसा करावा, याची रणनीती आखून दिली. या सत्रात केवळ व्याख्याने न होता शिबिरार्थींच्या शंकांचे निरसनही करण्यात आले.
Ahilyanagar Crime News : आधी दुकानदाराला बेदम मारहाण, मग थेट पोलिसांनाच दमदाटी!
समारोप आणि कृती कार्यक्रम: लोकशाहीच्या रक्षणासाठी सजग राहा!
शिबिराच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि अंतिम समारोप सत्रात विद्रोही चळवळीचे मार्गदर्शक लोकशाहीर संभाजी भगत आणि विचारवंत डॉ. भारत पाटणकर यांनी शिबिरार्थींना थेट आणि कृतीप्रवण करणारे मार्गदर्शन केले. “आजच्या काळात केवळ पोवाडे किंवा भाषणे पुरेशी नाहीत, तर तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला प्रतिगामी विचारांना चोख उत्तर द्यावे लागेल. प्रत्येक शिबिरार्थीने स्वतः एक माध्यम बनून समाजातील सत्य समोर आणले पाहिजे,” असे आवाहन लोकशाहीर संभाजी भगत यांनी आपल्या बुलंद आवाजात केले. तर डॉ. भारत पाटणकर यांनी, “नवसमाजमाध्यमे हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते परिवर्तनाचे एक मोठे व्यासपीठ आहे. त्याचा वापर शोषणाविरुद्धच्या लढ्यासाठी झाला पाहिजे,” असे प्रतिपादन केले.
शिबिराचे नेटके नियोजन आणि पडद्यामागील परिश्रम
या भव्य शिबिराचे नियोजन शिबिर संयोजन मार्गदर्शक लोकशाहीर संभाजी भगत, डॉ. भारत पाटणकर, कॉ. धनाजी गुरव आणि डॉ. जालिंदर धिगे यांच्या थेट देखरेखीखाली करण्यात आले होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी निमंत्रक प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, मा. अशोक दिवे, ॲड. कुमार शिंगारे, मा. संजयकुमार शिंदे, ॲड. अमोल सोनवणे, डॉ. श्रीकांत काळोखे, मा. ज्ञानदेव पानाडूळे आणि मा. महेश साळवे यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.
शिबिराच्या शेवटी, उपस्थित सर्व शिबिरार्थींनी आपापल्या भागात जाऊन डिजिटल क्षेत्रात सक्रिय होण्याचा आणि एक नवा सजग समाज घडवण्याचा संकल्प सोडला. अहिल्यानगर परिसरातील अनेक मान्यवरांनी या शिबिराला सदिच्छा भेटी दिल्या.






