'कॅमेऱ्यासमोर डायलॉगबाजी केली म्हणजे तुम्ही फार मोठ्या नेत्या होत नाहीत,' सुषमा अंधारेंचा नवनीत राणांना टोला
माजी खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीत एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. “मुख्यमंत्री असतानाच हनुमान चालीसा वाचली असती तर पक्षातील फूट, आमदारांचे बंड आणि पक्षाची पडझड टळली असती,” असे विधान त्यांनी केल्यामुळे आता नवा राजकीय वाद उद्भवला आहे. यावरून आता ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी नवनीत राणांवर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली आहे.
सुषमा अंधारे यांनी आपल्या अधिकृत ‘X ‘ अकाऊंटवरून पोस्ट करत नवनीत राणांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘कॅमेऱ्यासमोर डायलॉगबाजी केली म्हणजे तुम्ही फार मोठ्या नेत्या होत नाहीत,’ असा टोला लगावत अंधारेंनी नवनीत राणांना प्रत्युत्तर दिले आहे.
आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून अंधारे म्हणाल्या, “नवनीत राणा उगा आपलं डायसवर उभे राहिले की, बॉलीवूडच्या कॅमेऱ्यासमोर उभे राहिल्यासारखे डायलॉगबाजी केली म्हणजे तुम्ही फार मोठ्या नेत्या होत नाहीत…!!”
नवनीत राणा
उगा आपलं डायसवर उभे राहिले की, बॉलीवूडच्या कॅमेऱ्यासमोर उभे राहिल्यासारखे डायलॉगबाजी केली म्हणजे तुम्ही फार मोठ्या नेत्या होत नाहीत…!!
ना तुम्हाला हनुमान चालीसा म्हणता येते ना तुम्हाला नीट गणेशविसर्जन करता येतं… कुठल्या हिंदुत्वाच्या बाता.. आणि कसला स्वाभिमान आहे… — SushmaTai Andhare (@andharesushama) July 12, 2026
“ना तुम्हाला हनुमान चालीसा म्हणता येते ना तुम्हाला नीट गणेशविसर्जन करता येतं… कुठल्या हिंदुत्वाच्या बाता.. आणि कसला स्वाभिमान आहे तुम्हाला…? स्वाभिमान शाबूत असता तर स्वाभिमान युवा मंचाच्या बॅनर वरच निवडणूक लढवून जिंकायचा प्रयत्न केला असता ना…? स्वतःच्या कुटुंबातला पक्ष सोडून खासदारकी मिळावी म्हणून भाजपमध्ये गेलेल्या तुम्ही… अन् तुम्ही नैतिकतेच्या गप्पा मारायच्या होय… ?” असा खोचक सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
अमरावतीत एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नवनीत राणा म्हणाल्या की, “ते मुख्यमंत्री असताना त्यांना हनुमान चालीसा नको होती. सत्ता गेल्यानंतरच त्यांना राम आणि हनुमानाची आठवण झाली.”
त्यांनी पुढे आरोप केला की, मुख्यमंत्री असतानाच हनुमान चालीसा वाचली असती तर पक्षातील फूट, आमदारांचे बंड आणि पक्षाची पडझड टळली असती. तसेच स्वतःला तुरुंगात जावे लागलेल्या 14 दिवसांचा अनुभव आपण कधीही विसरणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
अमरावतीतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी, “लोक नगरसेवकपदासाठीही लोटांगण घालतात, पण मी स्वाभिमानी असल्याने राज्यसभेसाठी कधीही दुसऱ्यांच्या दारी गेले नाही. त्या संधीला ठोकर मारली. मी शांत आहे, पण शेरनी शांत असली तरी गर्जना करायला विसरत नाही. माझा स्वाभिमान इतका मोठा आहे की, राज्यसभेसाठी मी कोणाच्याही दारात गेले नाही. माझ्या विचारांशी तडजोड करण्यापेक्षा मी ती संधी नाकारली.” असे त्या म्हणाल्या.






