नेहमीची डिलिव्हरी ठरली हृदयस्पर्शी अनुभव: पुण्यातील ग्राहकाने स्विगीच्या महिला डिलिव्हरी पार्टनरला दिली ₹1,000 ची टिप
पुण्यातील स्विगीच्या एका महिला डिलिव्हरी पार्टनरला मोठा आनंददायी धक्का बसला, जेव्हा एका ग्राहकाने तिच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी तिला ₹1,000 ची टिप दिली.
गेल्या जवळपास वर्षभरापासून स्विगीसोबत डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम करणारी टीना चौधरी नेहमीप्रमाणे शहरात डिलिव्हरी करत होती. पावसाळ्यातील एका डिलिव्हरीदरम्यान, मुसळधार पावसातही वेळेवर ऑर्डर पोहोचवल्यामुळे आणि तिच्यासोबत तिची तीन वर्षांची मुलगी असल्याचे पाहून एक ग्राहक प्रभावित झाला. आव्हानात्मक परिस्थितीतही टीना यांनी दाखवलेल्या जिद्दीचे आणि समर्पणाचे कौतुक म्हणून त्या ग्राहकाने तिला ₹1,000 ची उदार टिप देत तिच्या पुढील प्रवासासाठी प्रोत्साहन दिले.
टीना यांना स्विगीमध्ये काम करण्याची प्रेरणा त्यांच्या पतींकडून मिळाली. त्यांचे पती गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ स्विगीमध्ये डिलिव्हरी पार्टनर म्हणून कार्यरत आहेत.
स्विगीसोबतचा आपला अनुभव सांगताना टीना म्हणाल्या, “मी याआधी दुसरीकडे काम करत होते. मात्र गर्भधारणेनंतर मला नोकरी सोडावी लागली. लहान बाळासोबत नियमित नोकरी करणे शक्य नव्हते, म्हणून मी स्विगीमध्ये काम सुरू केले. येथे मला कोणालाही उत्तर द्यावे लागत नाही आणि गरज पडल्यास मी माझ्या मुलीला माझ्यासोबत घेऊन जाऊ शकते. त्यामुळे काम करतानाच मला तिच्यासोबत वेळही घालवता येतो.”
टीना सांगतात की, अनेक ग्राहक त्यांना त्यांच्या मुलीसोबत पाहिल्यानंतर त्यांच्या प्रवासाला प्रेरणादायी म्हणतात. पुण्यातील मोजक्या महिला डिलिव्हरी पार्टनर्सपैकी एक असूनही टीना स्वतःला सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण समजतात.
त्या म्हणाल्या, “मला कधीही कोणतीही अडचण वाटली तर ती मोकळेपणाने सांगण्यास मी अजिबात संकोच करत नाही. आजपर्यंत मला रेस्टॉरंट पार्टनर्स, स्विगीची टीम आणि सहकारी डिलिव्हरी पार्टनर्स यांच्याकडून नेहमीच पूर्ण सहकार्य आणि आदर मिळाला आहे.”
टीना यांच्यासाठी डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम करणे हा आयुष्याला नवी दिशा देणारा अनुभव ठरला आहे. त्या शेवटी म्हणतात, “या कामात मेहनत आहे, पण त्या मेहनतीचं फळही मिळतं.”






