संग्रहित फोटो
सासवड/ संभाजी महामुनी : पुरंदर तालुक्यात विमानतळ प्रकल्प जाहीर झाल्यापासून वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. एकीकडे काही शेतकऱ्यांचा प्रखर विरोध तर दुसरीकडे संमती देण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोट्यावधींचा आकडा पाहून वर्षानुवर्षे लांब राहत असलेले नातेवाईक प्रशासकीय कार्यालयाच्या परिसरात कागदपत्रे घेवून घुटमळताना पाहायला मिळत आहेत. तर काही शेतकऱ्यांनी प्रकल्प झाल्यास आमचे कसे होईल असे सांगून नातेवाईकांना भावनिक गुंतवून शेतीच्या कागदपत्रातून बहिण, भाऊ, आई, वडिलांना गायब करून निराधार केल्याने त्यांचा अक्षरशः पालापाचोळा झाला आहे.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव अशा सात गावात आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या निमित्ताने जमिनीची संपादनाची प्रक्रिया सुरु आहे. आता शेतकऱ्यांच्या जमिनीची संमती घेवून त्यांना त्यांच्या क्षेत्राचे त्यातील विविध बांधकामे, इतर गोष्टींच्या नुकसानपोटी एकरकमी परतावा देण्यात येत आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या उपस्थितीत माहिती घेवून आणि खात्री झाल्यानंतर रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येत आहे.
दरम्यान भूसंपादनाच्या काळात वर्षानुवर्षे दूर झालेली नाती एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. तर काही हुशार मंडळीनी (ग्रामीण भाषेत त्याला गावगुंड म्हणतात) आई वडिलांना वृद्धापकाळात आजारी असल्याने उपचाराच्या नावाखाली रुग्णालयात नेतानाच तुमचे आधारकार्ड काढायचे आहे, पीएम किसान योजनेचे पैसे मिळायचे आहेत असे सांगून रजिस्टर कार्यालयात नेवून त्यांचे पद्धतशीर मृत्युपत्र बनवून सर्व जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली. काहींनी स्वतःच्या नावावर केल्यास बोभाटा होईल म्हणून पत्नीच्या नावावर खरेदीखताने जमीन करून बहिणींना पद्धतशीरपणे वगळले. या सर्व गोष्टी वडिलांच्या मृत्यू पश्चात आता वारस नोंद करताना उघडकीस येत आहेत.
काही मंडळीनी आपल्याला जादा मोबदला मिळावा आणि दुसऱ्या भावांच्यात वाटे व्हावेत, यासाठी काही वर्षापूर्वी हक्कसोड दिलेल्या बहिणींना हरकत घेण्यास सांगून भांडणे लावण्याचे उद्योग केले आहेत. तर एका घटनेत कुटुंबातील प्रमुखाने आपल्या वयस्कर आईला जिवंत असताना कागदोपत्री मयत दाखवून पैशासाठी माणूस किती खालच्या थराला जावू शकतो हे दाखवून दिले आहे. तर एका घटनेत कारभारी भावाने सख्ख्या बहिणींचे हक्कासोडपत्र न करता किंवा त्यांना कोणतीही माहिती न देता वडील आजारी असताना मृत्युपत्र तयार करून सर्व जमीन परस्पर भावांच्या नावे करून घेतली. वडिलाच्या मृत्युनंतर वारसनोंद करण्यासाठी बहिणींनी हट्ट धरल्यावर हे प्रकार समोर आले आहेत.
हक्क सोडपत्र दिल्यानंतरही मोबदल्यासाठी हरकती
अनेक बहिणींनी सुमारे १५ ते २० वर्षापूर्वीच भावाना जमिनीचे हक्क सोडपत्र करून वडिलोपार्जित जमीन तसेच इतर मालमत्तेतून आपला हक्क कायदेशीररीत्या लिहून दिला आहे. त्याचा मोबदला त्याच वेळी रोख स्वरुपात मोबदला तसेच सणावाराला साडी, चोळी, बांगडी असे सुरु आहे. यामध्ये काही कुटुंबात बहिण भावानचे नाते अव्याहतपणे सुरु आहे. तर काही ठिकाणी भावांनी वडिलांचे निधन झाल्यानंतर बहिणींकडे कोणत्याही प्रकारे लक्ष दिले नाही. मात्र अशा सर्व बहिणींनी आता विमानतळ प्रकल्पाचे पैसे मिळणार म्हणून थेट भूसंपादन अधिकाऱ्यांकडे लेखी हरकती नोंदवून आमचा हिस्सा देवून टाका अशी जाहीर मागणी केली आहे. त्यामुळे आता अशाच प्रकारच्या हरकतींचा पाऊस पडत आहे.
आई- वडिलांकडे दुर्लक्ष
अनेक प्रकरणांत असेही दिसून येते की, जमिनीचा मोबदला मिळणार असल्याने बहिण, भाऊ, आत्या यांच्यात मोठ्या प्रमाणात वाद सुरु आहेत. त्यातच आई वडिलांना कोणी सांभाळले, त्यांची दवा, पाणी कोणी बघितले, त्यांना कपडे कोणी घेतले यावरून वाद सुरु आहेत. अनेक कुटुंबात असे वाद सुरु असून वृद्ध आई वडील आपल्याच मुलांचे वाद भरल्या डोळ्यांनी पाहण्याव्यतिरिक्त काहीच करू शकत नाहीत, अशीही अवस्था झाली आहे. तर काही प्रकरणांत मुलींचे माही म्हणणे नाही, मात्र जावयांनी तर कहरच केला आहे, मला नाही तर कुणालाच नाही असे म्हणून थेट कोर्टात जाण्याची धमकीच दिल्याने त्यांची मनधरणी करताना सासरवाडीतील लोकांच्या नाकी नळ आल्याचे दिसत आहे. एकूणच विमानतळ प्रकल्पाच्या पैशाने काही ठिकाणी नाती जोडली देखील गेली आहेत तर काही नाती पैशाच्या निमित्ताने तात्पुरत्या स्वरुपात पुनर्जीवित झाल्याने ती पुढे कितपत टिकतील, हे सांगणेही कठीण आहे.






