अहमदाबाद विमान अपघाताचा पुण्यात दिसून आला परिणाम; दोन विमानांची उड्डाणं रखडली (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पुणे : अहमदाबाद येथील विमानतळावर गुरुवारी दुपारी घडलेल्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुण्याहून अहमदाबादला जाणाऱ्या दोन विमानांना फटका बसला. अहमदाबाद विमानतळ प्रवासी सेवेसाठी बंद केल्याने पुण्याहून अहमदाबादला जाणाऱ्या या विमानांना सायंकाळी सात वाजेपर्यत उड्डाणाची परवानगीच मिळालेली नव्हती. त्यामुळे प्रवाशांना पुणे विमानतळावर तासनतास ताटकळत बसावे लागले.
हेदेखील वाचा : ‘महिन्यापूर्वीच सिलेक्शन अन् विदेशात स्थायिक होण्याचं स्वप्न’; ३ मुलासंह लंडनला निघालेल्या दाम्पत्याचा विमान अपघातात मृत्यू
पुणे विमानतळावरून दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी आणि सायंकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी अहमदाबादकडे निघणारी दोन नियमित प्रवासी विमाने रखडली. या दोन्ही विमानांना, अहमदाबाद विमानतळावर प्रवासी विमानांना तात्पुरती बंदी असल्याने परवानगी मिळालेली नाही. अपघातग्रस्त विमानाच्या स्थलांतराचे काम सुरू असल्याने सर्व आगमन व प्रस्थान उड्डाणांत तात्पुरता बदल करण्यात आला आहे, अशी प्राथमिक माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटींवर दिली. या रखडलेल्या सेवांमुळे प्रवाशांमध्ये चांगलीच नाराजी पसरली असून, त्यांच्यासाठी कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही, अशी प्रवाशांची तक्रार आहे.
दरम्यान, ‘डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल अॅव्हिएशन’ (DGCA) आणि ‘एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया’ या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. पुणे विमानतळ प्रशासनाकडून देखील अद्ययावत माहिती प्रवाशांना देण्याचा प्रयत्न सुरू आहे. अहमदाबाद विमानतळावर जेव्हा स्लॉट मिळेल तेव्हाच पुणे विमानतळावरून विमानाचे उड्डाण होणार असल्याची माहिती पुणे विमानतळ प्रशासनाने दिली.
अहमदाबादहून लंडनला जाणारं विमान कोसळलं
अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचे विमान गुरुवारी कोसळलं. या अपघातात मृतांची संख्या वाढली आहे. आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. विमानात असलेल्या २४१ प्रवाशांचा आणि क्रू मेंबर्सचाही मृत्यू झाला आहे. विमान जवळच्या मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळलं, ज्यात २४ जणांचा मृत्यू झाला आहे.
लंडनला निघालेले विमान परतले
मुंबईहून लंडनच्या दिशेने निघालेले एअर इंडियाचे विमान एआय-१२९ हे उड्डाणानंतर काही वेळातच मुंबईकडे परतल्याची माहिती समोर आली आहे. ‘फ्लाईटराडार २४’ या प्लॅटफॉर्मवरून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी हे विमान नियमित वेळेनुसार लंडनसाठी रवाना झाले होते. मात्र, काही कारणास्तव ते परतीच्या मार्गावर आहे.