मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे १० पदरी होणार, वाहतूक कोंडीतून होणार सुटका
भारतातील सर्वात वर्दळीच्या महामागांपैकी एक असलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाढत्या वाहतुकीची गर्दी कमी करण्यासाठी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे अपग्रेडेशन प्रस्तावित केले आहे. सध्याच्या सहापदरीवरून १० पदरी सुपर हायवे तयार करण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे.
मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय महानगराला पुण्यासारख्या औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्राशी जोडणारा ९६ किलोमीटरचा हा महत्त्वाचा मार्ग आहे. वेगवान प्रवासासाठी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेचा वापर केला जातो. सध्या आठवड्याच्या दिवशी दररोज अंदाजे ६५,००० वाहने ये-जा करतात. शनिवार-रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी वाहनांची संख्या १ लाखांपेक्षा जास्त असते. दरवर्षी वाहतुकीचे प्रमाण अंदाजे ५-६% वाढते. वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे एक्सप्रेसवेचा विस्तार करण्यात येणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे, भूसंपादनातील आव्हाने कमीत कमी असण्याची अपेक्षा आहे. एमएसआरडीसीकडे आधीच विद्यमान एक्सप्रेसवेच्या बहुतेक भागांना लागून असलेली जमीन आहे. बोगद्याजवळ मर्यादित प्रमाणात अतिरिक्त जमीन लागणार आहे.
E-Battery Swapping : मोनो, मेट्रो स्थानकांजवळ ई-बॅटरी स्वॅपिंग; मेट्रोची जपानच्या कंपनीसोबत भागीदारी
१४,९०० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पात सध्याच्या पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यात येणार आहे. आर्थिक मॉडेलिंगचे काम सुरू आहे, परंतु जास्त खर्च असल्याने ते सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलद्वारे राबविले जाण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतील कळंबोली येथून सुरू होणारा आणि पुण्याजवळील किवळे येथे संपणारा हा एक्सप्रेसवे हा भारतातील पहिला प्रवेश-नियंत्रित महामार्ग आहे. या एक्सप्रेस वेचे उद्घाटन २००२ मध्ये झाले.