मसाप(फोटो-सोशल मीडिया)
प्रगती करंबेळकर/पुणे: महाराष्ट्र साहित्य परिषद पंचवार्षिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचा प्रचार सुरु असून साहित्य क्षेत्रातील या निवडणूकीला राजकीय स्वरुप आल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रचारात आरोप प्रत्यारोपच सुरु असून उमेदवारांच्या साहित्यातील योगदानाचा उल्लेख कमी केली जात आहे. भाषा संवर्धन आणि भाषेच्या हितासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना झालेली असून दहा वर्षाने होणाऱ्या या निवडणूकीत मतदार याद्या, राजकीय पक्ष आदी विषय चर्चेत असून साहित्यच मागे पडत आहे असा सूर साहित्यक्षेत्रातून येत आहे.
परिवर्तन उत्कर्ष आघाडी आणि साहित्य संवर्धन आघाडीने आपल्या भूमिका स्पष्ट केल्या असून भविष्यात आम्ही काय करु याचीच चर्चा सुरु आहे. जाहीरनाम्यात साहित्यिक योगदानाचा उल्लेख केला असला तरी मतदारांमध्ये उमेदवारांनी केलेल्या कामाच्या माहीतीची जनजागृती असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : PUNE NEWS : साहित्य क्षेत्रात राजकीय पक्षाची एन्ट्री? मसाप निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप
साहित्य परिषदेच्या निवडणूकीत उभे राहणाऱ्या उमेदवारांना साहित्या विषयक कोणतेही निकष नाही. मात्र साहित्याची राज्यस्तरावरची परिषद आणि यास लेखन, संपादन, साहित्यिक कार्याचा निकष असणे गरजेचा आहे अशी अपेक्षा साहित्य क्षेत्रातील मान्यवारांनी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार देशभरात गाजणारे साहित्य संमेलन असो वा भाषेसंदर्भात कोणतेही निर्णय असो यात साहित्य परिषदेतील पदाधिकाऱ्यांचा मोठा वाटा असतो म्हणूनच त्या पदासाठी उभ्या असणाऱ्या उमेदवाराचे साहित्यिक योगदान ग्राह्य धरणे आवश्यक आहे.
साहित्य संवर्धन आघाडीत साहित्यात कार्य करणाऱ्यांसोबतच नाट्य, चित्रपट तसेच पत्रकारिता क्षेत्रात कार्य करणारी लोक आहेत. साहित्य चित्रपट आणि नाट्य संस्थांना एकत्र आणून भाषेसाठी काम करण्याचा आमचा मानस आहे. मुख्य पदांसोबतच स्थानिक कार्यवाह पदाच्या उमेदवारांनी साहित्य क्षेत्रात काम केलेले आहे.
– सुनिल महाजन, साहित्य संवर्धन आघाडी
आमच्या पॅनेल मधील प्रत्येक उमेदवारांचे अध्यक्षापासून ते स्थानिक कार्यवाह क्र. ७ पर्यंत एकतरी पुस्तक प्रकाशित झालेले आहे. तसेच उमेदवारांना साहित्य संस्थेत काम करण्याचा अनुभव आहे. भाषेच्या हितासाठी काम करणे हे आमच्या उमेदवारांचे उद्दिष्ट आहे.
– विनोद कुलकर्णी, परिवर्तन उत्कर्ष आघाडी






