पुण्यातील वाहतूक कोंडी (फोटो - istockphoto)
पुणे: पुणे शहराभोवती दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत असल्याने नागरिकांसह वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.२७) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात विविध यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेत यात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
या बैठकीमध्ये खालीलप्रमाणे पुणे शहराभोवती असणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग आणि राज्यमार्गावर होणारी वाहतुक कोंडीबाबत विविध विभागांनी आपले मत नोंदविले. त्यानुसार या संयुक्त बैठकीत ठरल्याप्रमाणे वाहतूक कोंडी होणाऱ्या विविध भागात पुढील ३० दिवसात राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्गाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस अनधिकृत व अतिक्रमण केलेले दुकाने, गाळे, बांधकामे व इतर काही तात्पुरत्या स्वरूपाच्या बांधकामांवर सर्व विभागांनी संयुक्तपणे कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी सर्व विभाग संयुक्त कारवाई करणार असून त्याचे वेळापत्रक निश्चित केले.
संबंधित क्षेत्रातील महामार्ग व राज्यमार्ग रस्त्यालगतचे दुकाने, पत्राशेड, गाळे, टपरी व अनधिकृत बांधकामे स्वत:हून काढून घेण्याचे आवाहन स्थानिकांना करण्यात येत आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीलगत दुतर्फा होणाऱ्या संभाव्य अतिक्रमणांना आवर घालण्यासाठी सदर अतिक्रमण / निष्कासन कारवाई वर्षातून दोन वेळा यापुढे करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे नागरिकांनी बांधकामधारकांनी परवानगी घेऊन बांधकामे करावीत असे आवाहन डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.
या बैठकीस अतिरिक्त पोलीस आयुक्त, पुणे शहर मनोज पाटील, सह आयुक्त दिप्ती सुर्यवंशी-पाटील, अधिक्षक भूमी अभिलेखच्या आशा जाधव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक संजय कदम, पिंपरी चिंचवड मनपाचे शहर अभियंता मकरंद निकम, वाहतुक विभागाचे उपआयुक्त बापू बांगर, पुणे शहर सहायक पोलीस आयुक्त नंदिनी वग्याणी, पोलीस निरीक्षक महेशकुमार सरतापे, शंकर पाटील, मिनल पाटील, संतोष जाधव, बी. के. गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपाचे सह शहर अभियंता हरीयाल नरेश, MIDC चे उपअभियंता प्रकाश पवार, पुणे मनपाचे उप अभियंता महेश पाटील, सा.बां.विभागाचे कल्पेश लहिवाल, एमआयडीसी एम. एस. भिंगारदेवे, संभाजी लाखे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
खालीलप्रमाणे कारवाईचे नियोजन असून अनुक्रमे महामार्गाचे नाव आणि कारवाईची तारीख
१. पुणे – सोलापूर रोड (हडपसर ते यवत, व उरूळीकांचन ते शिंदवणे) : दि. ३ ते १० मार्च
२. पुणे – नाशिक रोड (राजगुरूनगर) : दि. ३ ते १० मार्च
३. चांदणी चौक ते पौड : दि. ३ ते १० मार्च
४. पुणे-सातारा रोड (नवले ब्रिज ते सारोळे) दि. १० ते २० मार्च
५. सुस रोड : दि. १० ते २० मार्च
६. हडपसर (शेवाळवाडी) ते दिवे घाट : दि. १० ते २० मार्च
७. नवलाख उंब्रे ते चाकण : दि. १० ते २० मार्च
८. हिंजवडी परिसर – माण : दि. १० ते २० मार्च
९. तळेगाव – चाकण – शिक्रापूर : दि. १० ते २० मार्च