स्वारगेट परिसरात महापालिकेची कारवाई (फोटो - टीम नवराष्ट्र /सोशल मिडिया)
पुणे: स्वारगेट स्थानकात झालेल्या बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभुमीवर महापािलकेच्या अतिक्रमण विभागाने या परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई केली. पुणे महापालिकेने अतिक्रमण विभागामार्फत दिलेले परवाने व फेरीवाला प्रमाणपत्रामधील अटी शर्तीचा भंग करणारे व्यावसायिक यामध्ये स्वतः व्यवसाय न करणे, पोटभाडेकरू ठेवणे, मान्य जागेवर व्यवसाय न करणे, मान्य व्यवसाय न करणे, सिलेंडरचा वापर करणे आदी प्रकारे अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली.
या कारवाईसाठी क्षेत्रिय अतिक्रमण निरीक्षक, अतिक्रमण निरीक्षक, सहाय्यक अतिक्रमण निरिक्षक, जेसीबी, बिगारी सेवक, पोलीस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी तसेच स्थानिक पोलीस कर्मचारी यांचे समवेत कारवाई सुरळीतपणे पार पडली. अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त संदीप खलाटे, महापालिका सहाय्यक आयुक्त प्रदीप आव्हाड, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या नियंत्रणाखाली पुणे शहर पोलिस अंतर्गत स्वारगेट पोलीस स्टेशन यांचे समवेत अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली.
स्वारगेट स्थानकावर बलात्काराची घटना घडल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. या परिसरात एसटी प्रशासनाकडून तसेच पोलिसांकडून लक्ष दिले जात नाही. अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यात राजकीय पक्षांकडून तसेच सामाजिक संस्थांकडून आंदोलन देखिल करण्यात आली आहेत. त्याची दखल घेत महापालिकेने स्वारगेट स्थानकावर अतिक्रमण कारवाई केली. असे अतिक्रमण विभागाने सांगितले.
पुण्यातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी ‘PMRDA’चा पुढाकार
पुणे शहराभोवती दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत असल्याने नागरिकांसह वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.२७) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात विविध यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेत यात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
या बैठकीमध्ये खालीलप्रमाणे पुणे शहराभोवती असणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग आणि राज्यमार्गावर होणारी वाहतुक कोंडीबाबत विविध विभागांनी आपले मत नोंदविले. त्यानुसार या संयुक्त बैठकीत ठरल्याप्रमाणे वाहतूक कोंडी होणाऱ्या विविध भागात पुढील ३० दिवसात राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्गाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस अनधिकृत व अतिक्रमण केलेले दुकाने, गाळे, बांधकामे व इतर काही तात्पुरत्या स्वरूपाच्या बांधकामांवर सर्व विभागांनी संयुक्तपणे कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले.
या बैठकीस अतिरिक्त पोलीस आयुक्त, पुणे शहर मनोज पाटील, सह आयुक्त दिप्ती सुर्यवंशी-पाटील, अधिक्षक भूमी अभिलेखच्या आशा जाधव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक संजय कदम, पिंपरी चिंचवड मनपाचे शहर अभियंता मकरंद निकम, वाहतुक विभागाचे उपआयुक्त बापू बांगर, पुणे शहर सहायक पोलीस आयुक्त नंदिनी वग्याणी, पोलीस निरीक्षक महेशकुमार सरतापे, शंकर पाटील, मिनल पाटील, संतोष जाधव, बी. के. गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपाचे सह शहर अभियंता हरीयाल नरेश, MIDC चे उपअभियंता प्रकाश पवार, पुणे मनपाचे उप अभियंता महेश पाटील, सा.बां.विभागाचे कल्पेश लहिवाल, एमआयडीसी एम. एस. भिंगारदेवे, संभाजी लाखे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.