‘पैज लावून सांगतो, मुंबईत भाजपला 90 जागा तर शिवसेनेला 40 जागा मिळतील’, चंद्रकांत पाटलांनी पुन्हा सांगितली भविष्यवाणी
Chandrakant Patil on BMC Election 2026 News Marathi : पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी गुरुवारी (१५ जानेवारी 2026) शहरातील ४१ प्रभागांत मतदान होत आहे. या निवडणुकीत ४१ प्रभागांतून एकूण १६५ नगरसेवक निवडले जाणार आहेत. शहरात एकूण ४०११ मतदान केंद्रांपैकी ९०६ केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. अतिसंवेदनशील मतदान केंद्रे नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. याचदरम्यान भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी मोठा राजकीय दावा केला असून मुंबई,ठाणे, पुण्यासह महापालिकांमध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचे म्हटलं आहे.
‘पैज लावून सांगतो’ असे म्हणत भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा महापालिका निवडणुकांबाबत अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातील 29 महापालिकांसाठी आज मतदान होत असून उद्या मतमोजणी पार पडणार आहे. निकाल जाहीर होण्याआधीच त्यांनी भाजपच्या संभाव्य जागांबाबत भाकीत मांडले आहे. मुंबई महापालिकेत भाजपला 90 जागा मिळतील, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 40 जागा मिळतील, असा दावा त्यांनी केला. पुण्यात 165 पैकी 115 जागा भाजप जिंकेल, असे ते म्हणाले. कोल्हापूरमध्ये 62, सांगलीत 55, तर इचलकरंजीत 65 पैकी 48 जागांवर भाजपचा विजय होईल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. हे भाकीत कितपत खरे ठरणार, हे उद्याच्या निकालातून स्पष्ट होणार आहे.
पुणे महानगरपालिकेबद्दल बोलताना पाटील यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली. “सहकार विभाग क्रमांक २४ मध्ये गणेश बिडकर आणि आमच्यासारखे इतर लोक मोठ्या फरकाने जिंकतील. पुण्यात ११५ जागांना तर आमच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. ज्यांना पैज लावयाच्या असतील त्यांनी खुशाल लावाव्यात”, असे आव्हानात्मक विधान त्यांनी केले. चंद्रकांत पाटील यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत आकडेवारीसह दावे केले. “मुंबईत भाजप 90 जागा आणि शिवसेना 40 जागा मिळवेल. मुंबई-ठाणे-पुण्यासह एकूण सहा महापालिकांमध्ये भाजपचा विजय निश्चित आहे,” असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
पुणे महापालिका निवडणुकीत मतदान प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी मतदाराने मतदान यंत्रावरील ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ या चारही गटांतील प्रत्येकी एक बट दाबणे अनिवार्य आहे. एखाद्या मतदाराला चारपैकी फक्त एका उमेदवाराला मत द्यायचे असल्यास उर्वरित तीन गटांसाठी ‘नोटा’चे बटण दाबून मतदान पूर्ण करावे लागेल. तसे न केल्यास संबंधित मतदान केंद्राध्यक्ष नियमानुसार ही प्रक्रिया पूर्ण करतील, अशी माहिती महापालिकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.






