पुणे महापालिकेनेच भरला नाही मालमत्ता कर; भाड्यापोटी तब्बल 35 कोटी थकित
पुणे : सामान्य पुणेकरांकडून मिळकतकर आणि पाणीपट्टीची दमडी-दमडी वसूल करण्यासाठी जप्तीसारखी कठोर कारवाई करणाऱ्या पुणे महापालिकेला स्वत:च्या मालमत्तांचे भाडे वसूल करण्यात मात्र अपयश आल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या मालकीच्या सदनिका, इमारती आणि मोकळ्या जागांच्या भाड्यापोटी तब्बल ३५ कोटी ४४ लाख २८ हजार ६१० रुपये थकित असल्याची धक्कादायक माहिती महापालिकेच्या अधिकृत उत्तरातून उघड झाली आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी नगरसेवक देवेंद्र वडके यांनी मालमत्ता विभागाच्या कारभाराबाबत आणि थकीत भाड्याबाबत लेखी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला प्रशासनाने दिलेल्या उत्तरातून थकबाकीचे वास्तव समोर आले. महापालिकेच्या मालकीच्या ११३२ सदनिका, २६३ इमारती आणि १५५२ मोकळ्या जागा असून, त्यापैकी मोठ्या संख्येने मालमत्तांचे भाडे अनेक वर्षांपासून थकीत आहे.
विशेष म्हणजे, एकूण थकबाकीपैकी सर्वाधिक हिस्सा मोकळ्या जागांच्या भाड्याचा आहे. १२१३ मोकळ्या जागांवरील थकीत भाडे तब्बल २४ कोटी ९९ लाख १० हजार १६३ रुपये इतके आहे. अनेक व्यक्ती, संस्था आणि कंत्राटदार महापालिकेच्या जागांचा वापर करून व्यावसायिक लाभ घेत असताना महापालिकेला देय असलेले भाडे मात्र भरले नसल्याचे समोर आले आहे. याशिवाय, ९९९ सदनिकांवर ६ कोटी ५१ लाख २७ हजार ५२ रुपये, तर १९३ इमारतींवर ३ कोटी ९३ लाख १० हजार ५९५ रुपये इतकी थकबाकी आहे. त्यामुळे महापालिकेच्या महसुलावर मोठा परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कर आणि पाणीपट्टी थकवणाऱ्या सामान्य नागरिकांवर कठोर कारवाई करणारे प्रशासन स्वत:च्या मालमत्तांचे भाडे थकविणाऱ्यांवर मात्र प्रभावी कारवाई करत नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या थकबाकीची प्रत्यक्ष वसुली कधी होणार, संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार का, की पुन्हा केवळ नोटिसांपुरतीच कारवाई मर्यादित राहणार, याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेच्या मालमत्तेचा लेखाजोखा
– एकूण सदनिका – ११३२
– एकूण इमारती – २६३
– एकूण मोकळ्या जागा – १५५२
थकबाकीचा तपशील
– सदनिका : ९९९ – ६५१२७०५२ रु.
– इमारती : १९३ – ३९३१०५९५ रु.
– मोकळ्या जागा : १२१३ – २४९९१०१६३ रु.
– एकूण : २४०५ मालमत्ता – ३५४४२८६१० रु.






