फोटो सौजन्य - Social Media
दिल्लीत जंतर मंतर येथे Cockroach Janta Party ने ‘चलो संसद‘ या आंदोलनाला सुरुवात केली. विद्यार्थ्यांसाठी न्याय मागण्यासाठी CJP पुरेपूर प्रयत्नशील आहे. दरम्यान, विविध क्षेत्रातून त्यांना पाठिंबाही दिले जात आहे. मनोरंजनसृष्टीतून विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात पाठिंब्याचा हात येत आहे. अशामध्ये ‘शिवा‘ या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री पूर्वा कौशिक या सर्व मुद्द्यांमुळे भावूक झालेली दिसली आहे. तिने पोस्ट शेअर केली आहे. मत मांडताना अभिनेत्री ढसाढसा रडली आहे.
पुर्वा कौशिक म्हणते की, “अशी कॅमेरासमोर येऊन बोलण्याची कधी वेळ येईल असं मला वाटलं नव्हतं.” सध्याच्या परिस्थितीमुळे पूर्वा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झालेली दिसत आहे. तसेच या सर्व परिस्थितीमध्ये आपल्याला काहीच करता येत नसल्याची भावना तिने सांगितली आहे. ती म्हणते की लोकशाहीत घडणाऱ्या अशा घटनांमुळे मनाला फार वेदना होत आहेत. तिचे म्हणणे आहे की लोकांसाठी झटणाऱ्या लोकांच्या वेदनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांना आपल्या परीने साथ कशी देता येईल? याचा विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे.
माणसाच्या जीवाची किंमत इतकी कमी झाल्याची जाणीव आपल्याला आतून हादरवून गेल्याचेही तिने सांगितले. आपल्या भावना दाबून ठेवणे शक्य झाले नाही म्हणूनच हा व्हिडिओ शेअर केल्याचे पूर्वाने स्पष्ट केले. या विषयावर प्रत्येकाची वेगवेगळी भूमिका असू शकते, याची जाणीव असूनही त्या क्षणी मनातील वेदना व्यक्त करणे आवश्यक वाटल्याचे तिने म्हटले. त्यामुळेच आपण भावूक झालो आणि डोळ्यात अश्रू आले, असेही ती म्हणाली.
पूर्वा कौशिकच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेक चाहत्यांसह मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनीही तिच्या भावनांना पाठिंबा दर्शवला आहे. सिद्धार्थ खिरीड, आकांक्षा गाडे, सृष्टी बाहेकर, अन्विता फलटणकर आणि आरती मोरे यांनी प्रतिक्रिया देत, सध्याची परिस्थिती पाहून आपल्या मनाची अवस्थाही अशीच असल्याचे नमूद केले आहे.






