संग्रहित फोटो
पुणे : कात्रज चौकात बहिणीची छेड काढल्याच्या रागातून अल्पवयीन मुलांसह त्यांच्या टोळीने एका १७ वर्षीय मुलाचा निर्घुन खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा खून जुन्या वाद-विवादातून देखील झाल्याची शक्यता आहे. या खूनाच्या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, अल्पवयीन मुलांना पोलिसांनी पोलिस गाडीच्या बोनेट वर बसवून आणत असताना खून झालेल्या मुलाच्या आईने अचानक पोलिस गाडी अडवून चप्पलने मारहाण केली. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे. याप्रकरणात चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तर, चौघांचा शोध सुरू आहे.
गणेश रविंद्र माळवे (वय १७, रा. कात्रज गाव) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी गणेश याच्या आईने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणात चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार रात्री दहाच्या सुमारास घडला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गणेश माळवे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. त्याच्यावर पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर, यातील अल्पवयीन मुले देखील पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. हे सर्व एकाच भागातील आहेत. दरम्यान, काही दिवसांपुर्वी गणेश याने यातील एका मुलाच्या बहिणीची छेड काढली होती. त्याप्रकरणात पोलिसांकडे तक्रार देखील दिली होती. मात्र, तेव्हा पोलिसांनी गणेशला आणून दम दिला होता. नंतर हे प्रकरण मिटले होते.
सोमवारी रात्री गणेश आणि त्याचा एक मित्र कात्रज तलावाजवळ मुख्य रस्त्यावर एका हॉटेलात थांबलेला होता. तेव्हा हे आरोपी दुचाकीवर त्याठिकाणी आले. त्यांनी गणेश याच्यावर अचानक हल्ला केला व निघृर्णपणे खून केला. दरम्यान, गणेश हा बाहेर होता. तो पुण्यात नव्हता. मात्र, शनिवारीच तो पुण्यात आला होता. आरोपी त्याच्या मागावर असावेत. त्यांनी पुर्ण नियोजन व कट रचून खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांचा आडमुठेपणा, आईकडून चप्पलने मारहाण
सोमवारी मध्यरात्री झालेल्या या खूनाच्या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालेले होते. चार अल्पवयीन मुलांना पकडल्यानंतर पोलिसांनी या मुलांमधील तिघांना पोलिस गाडीच्या बोनेटवर बसवून त्यांचे हात बांधत आणत (वरात) असतानाच अचानक गणेशच्या आईने थेट भररस्त्यात पोलिस गाडी अडवून या मुलांना चप्पलने मारहाण केली असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिसांची चांगली तारांबळ उडाली. पोलिस धावत पळत महिलेला अडवू लागले. लागलीच काही पोलिसांनी या मुलांची दावी सोडून त्यांना महिलेच्या तावडीतून सोडवले.






