लाडकी बहीण योजनेच्या पैशांचा प्रचारासाठी उल्लेख केल्याने पुणेकर मतदाराने योगेश टिळेकर विरोधात तक्रार दाखल केली आहे (फोटो - सोशल मीडिया)
पुण्यातील प्रभाग क्रमांक 40 मधील यश गजमल या रहिवाशाने सदर तक्रार दाखल केली आहे. हा मतदार याच भागातील रहिवासी असून त्यांनी प्रचारामध्ये येणाऱ्या मेसेजवरुन तक्रार दाखल केली. प्रचाराच्या मेसेजमध्ये लाडक्या बहिणींचे पैसे हे 14 तारखेला येणार असल्याचे म्हटले आहेत. तसेच महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. याचा उल्लेख मेसेजमध्ये करत मते मागितल्यामुळे यश गजमल यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
हे देखील वाचा : “…म्हणून अजितदादांनी आंदेकरांच्या घरात पुन्हा दिली उमेदवारी; आंदेकरांच्या मुलींनी मांडल्या भावना
काय आहे मतदाराची तक्रार?
प्रभाग क्र. ४० मध्ये विद्यमान आमदाराद्वारे रोख रक्कम हस्तांतरणाद्वारे मतदारांना प्रलोभन दिल्याबद्दल तक्रार दाखल करत असल्याचे तक्रारदार मतदाराने स्पष्टपणे लिहिले आहे. पत्रामध्ये लिहिले आहे की, “मी पुणे, प्रभाग क्र. ४० येथील रहिवासी आहे. विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांनी आदर्श आचारसंहितेचे आणि निवडणूक कायद्यांचे गंभीर उल्लंघन केल्याची बाब मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी, माझ्या आईला योगेश टिळेकर यांच्याकडून एक एसएमएस संदेश प्राप्त झाला, ज्यामध्ये असे नमूद केले होते की, लाभार्थींच्या बँक खात्यांमध्ये ₹३,००० ची रक्कम थेट जमा केली जाईल आणि मतदारांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या संदेशात स्पष्टपणे नमूद केले होते की, १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या एक दिवस आधी हे रोख हस्तांतरण केले जाईल,” असे तक्रारदाराने नमूद केले आहे.

लाडकी बहीण योजनेच्या पैशांचा प्रचारासाठी उल्लेख केल्याने पुणेकरांची योगेश टिळेकर विरोधात तक्रार दाखल केली (फोटो – सोशल मीडिया)
त्याचबरोबर पुढे लिहिले आहे की, “हा संदेश थेट लाभ हस्तांतरणाच्या (DBT) नावाखाली आर्थिक प्रलोभन देऊन मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दर्शवतो. अशा कृती लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ अंतर्गत लाचखोरी आणि भ्रष्ट आचरण मानल्या जातात आणि निवडणुकीदरम्यान लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचे थेट उल्लंघन आहे. राजकीय फायद्यासाठी मतदारांच्या वर्तणुकीत फेरफार करण्यासाठी सार्वजनिक निधी आणि कल्याणकारी योजनांचा वापर करणे हे लोकशाही प्रक्रियेची अखंडता आणि निष्पक्षता गंभीरपणे धोक्यात आणते. ही प्रथा एक धोकादायक पायंडा पाडते आणि मुक्त व निष्पक्ष निवडणुकांवरील जनतेचा विश्वास कमी करते,” असे देखील पुणेकर मतदाराने लिहिले आहे.
हे देखील वाचा : अमोल बालवडकरांचे तिकीट का कापले? चंद्रकांत पाटील यांनी केला खुलासा
मतदार गजमल यांनी निवडणूक आयोगाला विनंती केली आहे की, “या प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी, उल्लंघन सिद्ध झाल्यास संबंधित आमदार आणि पक्षावर कठोर कारवाई करावी, निवडणुकीच्या हेतूने असे कोणतेही हस्तांतरण होणार नाही याची खात्री करावी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मतदारांच्या लोकशाही हक्कांचे संरक्षण करावे, अशी मागणी तक्रारदार मतदाराने केली आहे. माझ्या तक्रारीच्या समर्थनार्थ आवश्यक असलेले स्क्रीनशॉट आणि इतर कोणतेही अतिरिक्त पुरावे सादर करण्यास मी तयार आहे. या गंभीर विषयाकडे त्वरित लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद,” असे देखील मतदार यश गजमल म्हणाले आहेत.






