पुणे ते प्रयागराज दरम्यान दोन विशेष रेल्वे
गाडी क्रमांक ०१४११ पुणे – प्रयागराज एकमार्गी विशेष गाडी शनिवार, २७ डिसेंबर २०२५ रोजी पुणे येथून सायं ७.५५ वाजता सुटेल. आणि दोन दिवसानंतर दुपारी वाजता प्रयागराज येथे पोहोचेल.तर गाडी क्रमांक ०१४९९ पुणे– प्रयागराज एकमार्गी विशेष गाडी ही बुधवार, ३१ डिसेंबर रोजी पुणे येथून सायं ७.५५ वाजता सुटेल आणि दोन दिवसानंतर दुपारी दोन वाजता प्रयागराज येथे पोहोचणार आहे. या गाडीचे थांबे हे हडपसर, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, अंकाई, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, गोविंदपुरी व फतेहपूर येथे असणार आहेत.
गाडी क्रमांक ०१४११ व ०१४९९ या गाडीच्या आरक्षित स्लीपर श्रेणीसाठी आरक्षण २५ डिसेंबर २०२५ पासून सर्व पीआरएस केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या www.irctc.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत.प्रवाशांनी या विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा व त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वे पुणे विभागाकडून करण्यात आले आहे.
लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या भाड्यात भारतीय रेल्वेने किरकोळ वाढ केली आहे. २१५ किलोमीटरपेक्षा अधिक अंतरासाठी सामान्य वर्गात प्रवास केल्यास आता प्रति किलोमीटर १ पैशाची अतिरिक्त आकारणी होणार आहे. तसेच मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या नॉन-एसी कोचसह सर्व एसी वर्गांमध्ये प्रति किलोमीटर २ पैशांची वाढ करण्यात आली आहे. रेल्वेने दिलेल्या उदाहरणानुसार, ५०० किलोमीटर अंतराच्या नॉन-एसी प्रवासासाठी प्रवाशांना केवळ अतिरिक्त १० रुपये अधिक मोजावे लागतील. त्यामुळे ही भाडेवाढ अत्यल्प असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.
नवीन भाडे प्रणालीअंतर्गत उपनगरीय लोकल गाड्या आणि मासिक हंगामी तिकिटे (MST) यांच्या भाड्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. तसेच सामान्य वर्गात २१५ किलोमीटरपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी जुनेच भाडे लागू राहणार आहे. त्यामुळे रोजच्या प्रवासासाठी रेल्वेचा वापर करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. उपनगरीय सेवांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गेल्या दशकात रेल्वे नेटवर्कचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. कामकाजाचा व्याप वाढला असून, सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना अधिक कडक करण्यात आल्या आहेत. यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले असून त्यामुळे खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या रेल्वेचा कर्मचाऱ्यांवरील खर्च ₹१.१५ लाख कोटींवर पोहोचला आहे, तर पेन्शनवरील खर्च सुमारे ₹६०,००० कोटी रुपये आहे. २०२४–२५ या आर्थिक वर्षासाठी रेल्वेचा एकूण परिचालन खर्च ₹२.६३ लाख कोटींवर गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.






