पुरंदर विमानतळास ग्रामस्थांचा तीव्र विरोध (फोटो सौजन्य-X)
सासवड : पुरंदरचा विमानतळ प्रकल्प पुरंदरच्या जनतेसाठी नाही तर अदानीसारख्या लोकांच्या घशात घालण्यासाठी केलेला प्रकल्प आहे. यातून स्थानिक कोणालाही नोकऱ्या लागणार नाही. एकदा जमीन गेल्यावर आपल्याला कोणीही विचारणार नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विमानतळ प्रकल्प होऊ देणार नाही, तरीही सरकार प्रकल्प करणार असेल तर आमच्या प्रेतावर जरूर करावा, असा इशाराच माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी दिला आहे.
राज्य शासनाने पुरंदर विमानतळ प्रकल्पाबाबत नुकतीच महत्वाची घोषणा केली असून, प्रकल्पबाधित वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, एखतपूर, खानवडी, मुंजवडी आणि कुंभारवळण या सात गावांतील प्रकल्पबाधित क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित केले. त्याबरोबरच या भागातील जमिनीवरील खरेदी विक्रीच्या व्यवहारांना बंदी घालण्यात आली. प्रकल्पातील येणाऱ्या गावातील जमिनीचे क्षेत्र त्यांचे सर्व्हे नंबर शेतकऱ्यांच्या नावांसह जाहीर करण्यात आले असून, येत्या काही दिवसांत जमिनीवर एमआयडीसी करून शिक्के मारण्याची मोहीम राबविण्याच्या दृष्टीने त्यांची तयारी सुरु आहे.
शासनाकडून विमानतळ प्रकल्पाबाबत जोरदार हालचाली सुरु असून, एक-एक पाऊल पुढे टाकले जात आहे. त्यामुळे प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. विमानतळ प्रकल्प झाल्यास आपल्या सर्व जमिनी जाऊन भूमिहीन होण्याची शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे. त्यामुळे शासनाच्या भूमिकेचा निषेध आणि प्रकल्पाला विरोध दर्शनाविण्यासाठी प्रकल्पबाधित सात गावातील शेतकऱ्यांनी पारगाव येथे निषेध सभा आयोजित केली होती. यावेळी प्रकल्प बाधित गावांचे सरपंच, सदस्य, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रकल्पाचे समर्थन करणार नाही
यावेळी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी उपस्थितांना कोणत्याही स्थितीत प्रकल्प होऊ देणार नाही, प्रकल्पाचे समर्थन करणार नाही, वेळप्रसंगी पोलिसांच्या लाठ्या, काठ्या खाऊ, तुरुंगात जाण्याची तयारी ठेवू परंतु मागे हटणार नाही, अशा प्रकारची शपथ दिली.