राहुल गांधी आपला दावा मागे घेणार (फोटो- ani)
पुणे: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बदनामी प्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी पुणे कोर्टात पार पडली. सात्यकी सावरकर हे नथुराम गोडसे यांचे वंशज आहेत. सध्या सुरु असलेल्या राजकीय संघर्षांमुळे व तक्रारदार सात्यकी सावरकर हे नथुराम गोडसे यांचे वंशज असल्याने माझ्या जीविताला धोका असल्याचा दावा राहुल गांधी यांनी कोर्टात केला होता. त्यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी दावा केला होता. मात्र आता हा दावा मागे घेतला जाणार असल्याचे समजते आहे.
राहुल गांधी यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा आता मागे घेण्यात येणार आहे. राहुल गांधी यांच्या वकिलांनी याबाबतचा दावा कोर्टात केला होता. मात्र याबाबत काँग्रेस पक्षाच्या कायदेशीर टीमकडून सूचना आल्याने हा दावा मागे घेतला जाणार असल्याचे समजते आहेत. राहुल गांधी यांच्याशी चर्चा न करता परस्पर दावा पुणे कोर्टात करण्यात आला होता.
राहुल गांधींच्या वकिलांच्या अर्जात काय होते?
‘तक्रारदार सात्यकी सावरकर यांनी २९ जुलै २०२५ रोजीच्या लेखी निवेदनात महात्मा गांधींच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी नथुराम गोडसे, गोपाल गोडसे यांचा मातृवंशीय वंशज असल्याची स्पष्ट कबुली दिली आहे. सत्य, अहिंसा आणि धर्मनिरपेक्षेतेचे पुरस्कर्ते असलेल्या महात्मा गांधींच्या हत्येत तक्रारदारांच्या पूर्वजांचा थेट सहभाग हे निर्विवाद ऐतिहासिक तथ्य आहे.
राहुल गांधी सुद्धा सत्य, अहिंसा, दुर्बलांची सेवा, आणि घटनात्मक मार्गानेच राजकारण करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी इतर विरोधी पक्ष नेत्यांसह ११ ऑगस्ट २०२५ रोजी ‘व्होट चोर सरकार’ अशा घोषणा देत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी सुमारे ३०० खासदारांना सराईत गुन्हेगाराप्रमाणे अटक करून एका बसमध्ये डांबून ठेवले होते. राहुल गांधी यांनी निवडणुकीतील अनियमिततेचे पुरावे सादर करत निवडणूक आयोगालाच थेट लक्ष्य केले होते. तक्रारदाराच्या वंशाशी संबंधित हिंसक आणि संविधानविरोधी प्रवृत्तींच्या नोंदी; तसेच सध्याच्या राजकीय वातावरणाचा विचार करता राहुल गांधींना शारीरिक इजा होण्याचा, त्यांच्यावर खोटे आरोप किंवा लक्ष्य करण्याचा आणि इतिहासाची पुनरावृत्ती होण्याचा गंभीर धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांना प्रतिबंधात्मक संरक्षण देणे हे सरकारचे घटनात्मक कर्तव्य आहे,’ असे या अर्जात नमूद आहे.
राहुल गांधींवर फौजदारी कारवाई करा
दरम्यान, विरोधी पक्षनेते हे घटनात्मक पद भूषविणाऱ्या राहुल गांधी यांनी न्यायालयात खोटे विधान करून न्यायालयाचा अवमान आणि शपथभंग केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करावी, असा अर्ज सात्यकी सावरकर यांचे वकील अॅड. संग्राम कोल्हटकर यांनी बुधवारी विशेष न्यायालयात केला. या प्रकरणी आता ११ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.