सौजन्य - नवराष्ट्र टीम
मुंबई : पुण्याच्या कोथरुड पोलिसांनी तीन तरुणींना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार तरुणींनी केली होती. त्यांच्या तक्रारीची साधी दखलही पोलिसांनी घेतली नाही. १२ तासांहून अधिक काळ पोलीस आयुक्तालयात ठिय्या आंदोलन करूनही दोषी पोलिसांवर गुन्हा नोंद केला नाही. ऊलट त्या तीन तरुणींवरच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींऐवजी पीडितांवर गुन्हा दाखल करण्याचा प्रताप पुणे पोलिसांनी केला आहे. हा चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
१ ऑगस्ट रोजी कोथरूड पोलिसांनी तीन मुलींना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केली होती. त्यांना मारहाण आणि शिवीगाळ करणा-या पोलिसांवर तात्काळ ॲट्रॅासिटी कायद्याखाली गुन्हा दाखल केला पाहिजे होता पण पोलिसांनी त्यांची साधी तक्रारही घेतली नाही. म्हणून या पीडित मुलींनी पोलीस आयुक्तांलयात दाद मागितली पण प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी तिथेच ठिय्या आंदोलन केले. पण पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही, उलट या प्रकरणी गुन्हा दाखल करता येणार नाही असे पत्र देऊन पीडितांना पाठवून दिले.
याप्रकरणी पुणे पोलिसांविरोधात जनमानसातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असणारे पोलीसच जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण करत आहेत, आणि त्यांच्यावर कारवाई होत नाही. पण ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले जात आहेत, हे पुण्यात पोलिसांचे जंगलराज आल्याचे निदर्शक आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
नेमकं प्रकरण काय ?
1 ऑगस्टला हा सगळा प्रकार समोर आला होता. कोथरूड पोलिसांनी तीन मुलींना मारहाण आणि जातीवाचक शब्दात शिवीगाळ केल्याचा आरोप मुलींनी केला होता. तुम्ही किती मुलांसोबत झोपलात? तुम्ही लेस्बिअन आहात का ? अशा घाणेरड्या शब्दात पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून या मुलींना प्रश्न विचारले होते, असा आरोप तीन मुलींनी केला होता. याप्रकरणी या मुली आणि त्यांचे काही सहकारी आक्रमक झाल्याच पाहायला मिळालं होत. आणि त्यांनी थेट पोलिसांकडेच दाद मागायला सुरुवात केली. मात्र पोलिसांकडनं कोणतीही दाद मिळत नसल्याचा आरोप देखील याच मुलींच्या सहकाऱ्यांनी केला होता.