कोकणसह राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता (File Photo)
कोकणात पावसाचा अंदाज असून, विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात हवामान काहीसे अस्थिर राहण्याची शक्यता आहे. गडचिरोलीमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. विशेषतः दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास अचानक वातावरण बदलण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतली असून, दुसरीकडे उन्हाचा चटका आणि उकाडा वाढू लागला आहे. सध्या राज्यात याच ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभाव जाणवू लागला आहे. अशातच दिलासादायक बाब म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
वाळू उपशाला लगाम ! इंदापूर तालुक्यातील माळवाडीत महसूलची मोठी कारवाई; तीन बोटी उद्ध्वस्त
दरम्यान, ऊनाचा कडाका तर पावसाची शक्यता त्यामुळे आता पुढील काही दिवसांतही हवामानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
कोल्हापुरातही विजांसह पावसाची शक्यता
कोकणातील सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही विजांसह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात. राज्यातील उर्वरित भागात मात्र आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
तापमान वाढीची नोंद
सध्या पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे दिवसाच्या तापमानात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. आता उन्हाचा चटका अधिक जाणवू शकतो. त्यासोबतच वातावरणातील उकाडाही वाढण्याची शक्यता आहे.
पुणे शहराला ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच पुणे शहरात उष्णतेचा चटका तीव्रतेने जाणवू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील कमाल आणि किमान तापमानात सातत्याने वाढ होत असून, पुणेकरांना आता ‘ऑक्टोबर हिट’चा थेट सामना करावा लागत आहे. सोमवारी (५ ऑक्टोबर) शहरात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १९.७ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.






