संग्रहित फोटो
बारामती : देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या दरात अल्पावधीत झालेल्या मोठ्या वाढीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. देशात साखरेचा मुबलक साठा असतानाही दरात अचानक वाढ कशी झाली, असा सवाल उपस्थित करत याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सखोल चौकशीची मागणी केली आहे.
बारामती येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी अमरसिंह कदम, राजेंद्र ढवाण यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. शेट्टी यांनी २२ ऑगस्ट रोजी लिहिलेल्या पत्रात साखरेच्या दरवाढीचा तपशील मांडला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ऑगस्ट २०२५ मध्ये साखरेचा दर सुमारे ३७०० रुपये प्रतिक्विंटल होता. यंदा ऑगस्टमध्ये हा दर सुमारे ६७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच वर्षभरात प्रतिक्विंटल सुमारे ३००० रुपयांची वाढ झाली आहे. अलीकडील काळातही किलोमागे सुमारे २० रुपयांची अचानक वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
देशातील साखरेच्या उपलब्धतेबाबतही शेट्टी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. २०२४-२५ मध्ये सुमारे २६० लाख टन, तर २०२५-२६ मध्ये सुमारे २९० लाख टन साखरेचे उत्पादन झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. मागील हंगामातील सुमारे ५० लाख टन प्रारंभिक साठा धरल्यास देशात मोठ्या प्रमाणात साखर उपलब्ध असताना दरवाढ होण्यामागचे कारण काय, असा सवाल त्यांनी केला आहे.
दरम्यान, वाढलेल्या साखर दराचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळत आहे का, हा महत्त्वाचा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सध्याच्या बाजारभावानुसार ऊस उत्पादकांना प्रतिटन सुमारे ५५०० रुपये दर मिळायला हवा, मागील वर्षी पुरवलेल्या उसासाठी अतिरिक्त १००० रुपये प्रतिटन देण्याची मागणी शेट्टी यांनी केली आहे.
शक्तीपीठ महामार्गाला कायम विरोधच
शक्तिपीठ महामार्गामुळे संबंधित जिल्ह्यातील हजारो एकर बागायत जमिनी संपादित होणार आहेत, त्यामुळे या शेतकऱ्यांना भूमिहीन होण्याची वेळ येणार आहे. वास्तव पहता धार्मिक स्थळांना या महामार्गाचा फायदा होणार नाही. सध्याचे बांधलेले महामार्ग असताना, शक्तिपीठ महामार्गाची गरज काय? असा सवाल करत, ज्या कारणासाठी हा महामार्ग बांधण्याचे नियोजन आहे, मात्र प्रत्यक्षात अनेक धार्मिक स्थळांच्या लांबून हा महामार्ग जाणार आहे. संत सावता माळी यांचे जन्मगाव असलेल्या श्रीक्षेत्र अरण येथून सावता महाराजांच्या मंदिराच्या वरून हा महामार्ग जाणार आहे, त्यामुळे हा शक्तिपीठ महामार्ग धार्मिक स्थळे स्मृती आड करण्यासाठी बांधला जातोय का, हा सवाल व्यक्त करत या महामार्गाला आमचा कायम विरोध असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करा
केंद्र सरकारने दरवाढ रोखण्यासाठी कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिल्याच्या निर्णयावरही शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आयात केलेली साखर बाजारात आल्यानंतर पुढील हंगामात दर कोसळून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे साखरेचे दर नियंत्रित करताना ऊस उत्पादकांच्या हिताचे संरक्षण करावे आणि संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.
हे सुद्धा वाचा : सिंहगड रस्त्यावरील अपघातात तरुणीचा मृत्यू; पीएमपी बसमधून पडली अन् थेट…
साठेबाजी, काळाबाजार, कृत्रिम टंचाई
साखरेची साठेबाजी, काळाबाजार किंवा कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे का, याची चौकशी करण्याची मागणी शेट्टी यांनी केली आहे. मागील सहा महिन्यांतील साखरेची विक्री, साठा व साखर कारखानदार आणि व्यापाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करावी, असे त्यांनी म्हटले आहे. या व्यवहारांत २० हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.






