SIR कामावर हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
नाशिक येथे काँग्रेसच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांसाठी आयोजित दहा दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनावेळी सपकाळ माध्यमांशी बोलत होते. या शिबिरात काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
SIRच्या कामासाठी 17 ऑगस्टची अंतिम मुदत ठेवण्यात आली होती. मात्र, ही मुदत आणखी दोन ते तीन महिने वाढवली असती, तर मतदार यादीचे काम अधिक सुरळीतपणे पूर्ण करता आले असते, असे सपकाळ यांनी सांगितले. ‘भाजपा मतचोरी करत होते, आता तर मतदार याद्याही चोरत आहेत,’ असा आरोप करत हा प्रकार लोकशाहीला हुकूमशाहीच्या दिशेने घेऊन जाणारा असल्याची टीका त्यांनी केली.
नागपूरमधील हैदराबाद हाऊस येथे बीएलओंना बोलावून मॅपिंगशी संबंधित कागदपत्रे आणण्यास सांगितल्याचा दावाही सपकाळ यांनी केला. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आणि कार्यालय असलेल्या ठिकाणी अशा प्रकारे निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावणे योग्य आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाचा उल्लेख करत सपकाळ यांनी राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा केला. महिला आरक्षण विधेयकाबाबत भाजपाकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
2023 मध्येच महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर झाले असून, आता त्याच्या अंमलबजावणीशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी, असे सपकाळ म्हणाले. भाजप नेत्यांकडून राहुल गांधी यांच्यावर केले जाणारे आरोप तथ्यहीन असल्याची टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसाठी सुरू झालेले हे प्रशिक्षण शिबिर दहा दिवस चालणार असून, पक्षाची भूमिका आणि संघटनात्मक कार्यक्रम तळागाळापर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जाणार असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.






