पुण्यात ४७३ गाड्यांचा होणार लिलाव
पुणे: देशातील जुनी वाहने भंगारात काढण्यासाठी सरकारने नुकतेच नवीन ‘वाहन स्क्रॅप धोरण’ लागू झाले आहे. या धोरणानुसार १५ वर्षे पेक्षा जून्या गाड्यांची पूर्ननोंदणी आरटीओ कार्यालयाने नोंदणी बंद केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या मालकीच्या ४७३ गाड्यांचा लिलाव करण्याचा महापालिकेने निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज (मंगळवार ) हा लिलाव होणार असून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संस्थेने गाड्यांचा लिलाव केला जाणार आहे, अशी माहीती अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.
केंद्र सरकाच्या वाहन स्क्रॅप धोरणानुसार महापालिकेच्या १५ वर्षे पेक्षा जून्या गाड्यांची नोंदणी आरटीओने रद्द केल्या आहेत. हे धोरण लागू होण्यापूर्वी महापालिकेकडून २४ ते २५ वर्षापर्यंत गाड्या वापरात आणल्या जात होत्या. त्यामुळे वाहने रस्त्यात बंद पडणे, गाड्यांचा पार्ट तुटणे असे प्रकार घडत होते. नवीन गाड्या घेण्यासाठी केली जाणारी दिरंगाई यामुळे महापालिकेच्या मोटार वाहन विभागाला या गाड्या दुरुस्त करुन वापरण्याची वेळ येत होती. परंतु आता केंद्राच्या धोरणानुसार महापालिकेच्या विविध विभागातील एकूण ४७३ गाड्यांचा लिलाव महापालिकेच्या नेमलेल्या समितीने निर्णय घेतला आहे.
जी वाहने केंद्र किंवा राज्य सरकारच्या चलनातून बाहेर काढली जातील किंवा जी अतिरिक्त आहेत किंवा दुरुस्त केली जाऊ शकत नाहीत, ती नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग फॅसिलिटीकडे स्क्रॅपिंगसाठी पाठवली जातील. या व्यतिरिक्त, कोणत्याही वाहनांचा लिलाव, जप्त किंवा हक्क नसलेली वाहने नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग फॅसिलिटीवर वाहनांना स्क्रॅप केले जाईल याचे नियम निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिकेची ४७३ वाहनांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. अशी माहिती मोटार वाहन विभागाचे प्रमुख जयंत भोसेकर यांनी सांगितले.
स्क्रॅप झालेल्या वाहनांची किंमत महापालिकेच्या समितीने तसेच राज्य सरकारने नेमण्यात आलेल्या यंत्रणेकडून किंमत निश्चित करण्यात आली आहे. ही किंमत गोपनीय असल्यामुळे या गाड्यांची किंमत सध्या जाहीर करता येणार नाही, असे भोसेकर यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने ४ चे ५ एजन्सी नेमल्या आहेत. एजन्सींच्या माध्यमातून गाड्यांची खरेदी केली जाणार आहे. या एजन्सींकडून बोली लावण्यात येईल, समितीने आणि राज्य सरकारच्या यंत्रणेने निश्चित केलेल्या रकमेपेक्षा जी किंमत अधिक मिळेल, त्या किंमतीला या गाड्यांची विक्री केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.