आळंदी : श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये सन २०१२- २०१३ पासून कार्यरत असणाऱ्या विनाअनुदानित शिक्षकांनी २० डिसेंबरपासून सुरु केलेले धरणे आंदोलन तब्बल १७ व्या दिवशीय कायम राहिले. विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी प्रशालेच्या द्वारात धरणे आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान, आंदोलनात फूट पाडून आंदोलन धडपण्याचा डाव शिक्षकांनी उधळवून लावत आंदोलन सुरुच ठेवले आहे. येत्या दोन दिवसांत मागण्याची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या विद्यालयातील विनाअनुदानित शिक्षकांनी डी. एड. श्रेणीतील रिक्त जागांवर सेवाज्येष्ठतेने वेतनश्रेणीतील उपशिक्षक पदावर नेमणूक करावी, यासाठी गेल्या १७ दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.
शाळेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या
शाळेच्या प्रवेशद्वारावर शिक्षकांनी ठिय्या मांडला असून, शिक्षकांच्या मागण्या संस्थाचालक मान्य करीत नसल्याचे आंदोलकांनी सांगितले. गेले ९ वर्षे शासनाचा कोणताही पगार न मिळता प्रामाणिकपणे कार्य करूनही संस्थाचालक अनुदानितच्या रिक्तपदांवर शासन नियमाप्रमाणे नेमणूक का करत नाही ? असा सवाल आंदोलनकर्त्या शिक्षकांनी केला.
आज ना उद्या आम्हाला न्याय मिळेल, या प्रतीक्षेत आमच्या आयुष्यातील उमेदीची १० वर्षे गेली. तरी देखील आम्हाला न्याय भेटत नसेल, तर येत्या २ दिवसात मागण्या मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्या शिक्षकांनी दिला आहे.






