परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (फोटो- सोशल मीडिया)
प्रताप सरनाईक यांनी दिली स्वारगेट स्थानकाला भेट
स्वारगेट बलात्कार प्रकरणात सरनाईक यांनी व्यक्त केली नाराजी
सरनाईक यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फटकारले
पुणे: स्वारगेट बलात्कार प्रकरणात दोषी आढलेल्या अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतरही त्यांची पुन्हा स्वारगेट आगारात नेमणूक झाल्याचे उघड झाल्यावर राज्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “आम्ही विधानसभेत उत्तर देतो, कारवाईनंतर सुधारणा होईल अशी अपेक्षा असते. मग दोषी आढलेल्या अधिकाऱ्यांची पुन्हा त्या ठिकाणी नेमणूक कशी होते,” असा सवाल करत सरनाईक यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फटकारले.
अशा गंभीर चुका करणाऱ्यांवर कोणतीही गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी संबंधितांवर तात्काळ कारवाईचे आदेश दिले.पुणे दौऱ्यावर असताना सरनाईक यांनी लोणावळा, शिवाजीनगर व स्वारगेट बसस्थानकांची पाहणी केली. प्रवासी प्रतीक्षालय, स्वच्छतागृह, चालक-वाहक विश्रांतीगृह आदी सुविधा तपासल्या. प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या तक्रारी ऐकून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले.
मंत्री सरनाईक म्हणाले की फेब्रुवारी २०२५ मध्ये स्वारगेट बसस्थानकावर घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर सर्व राज्य हादरुन गेले होते. अशावेळी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. स्वारगेट बसस्थानकावरील वरिष्ठ आगार व्यवस्थापक,कनिष्ठ आगार व्यवस्थापक व दोन सहायक वाहतूक अधीक्षकांना निलंबित करण्यात आले आणि त्यांची विभागीय चौकशी लावण्यात आली. याबाबतचे निवेदन विधानभवनात मी स्वतः केले. त्यानंतर निलंबित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित होते.
🗓 १५ सप्टेंबर २०२५ | 📍पुणे
पुणे दौऱ्यादरम्यान स्वारगेट बसस्थानकाला भेट दिली व तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला.
फेब्रुवारी – २०२५ मध्ये स्वारगेट बसस्थानकावर घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर सर्व राज्य हादरुन गेले होते. अशावेळी एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली.… pic.twitter.com/MIvQpWlDK4— Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) September 15, 2025
तत्पूर्वी खात्यांतर्गत विभागीय चौकशी नि; पक्षपाती होण्यासाठी त्यांची बदली अन्यत्र करणे गरजेचे होते. असे असताना प्रादेशिक व्यवस्थापक यांनी त्यांच्या बदल्या अन्यत्र न करता तेथेच त्यांची नियुक्ती केली. हे नियमाला धरून नाही. त्यामुळे दोषींना आपण पाठीशी घालतोय, असा संदेश समाजात गेला.या पार्श्वभूमीवर संबंधित प्रादेशिक व्यवस्थापकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार असून निलंबनानंतर स्वारगेट बसस्थानकावर नियुक्ती केलेल्या अधिकारी व पर्यवेक्षकांची तातडीने बदली करण्यात येत असल्याचेही सरनाईक यांनी जाहीर केले.