पेण/ विजय मोकल :- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून महामार्गाच्या कडेला साचलेली माती, खडी आणि धूळ यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आसल्याने जनआक्रोश समितीच्या सहकार्याने श्रमदान मोहीम राबविण्यात आली.मुंबई – गोवा महामार्गावरील खडी आणि धूळ दुचाकीस्वारांसाठी अतिशय धोकादायक ठरत आहे. मोठ्या वाहनांना ओव्हरटेक करताना या खडीमुळे घसरून अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.
मात्र एवढं सगळ होत असतानाही याबाबत प्रशासनाच्या दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. वडखळ ब्रिजवरील ही गंभीर परिस्थिती निदर्शनास आणल्यानंतर असे आढळून आले की, अनेक पुलांवरही अशीच परिस्थिती आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून तक्रारी नोंदवल्या जातात, मात्र त्यानंतर करण्यात येणारे उपाय अपुरे ठरत आहेत. यामुळे लोकसहभागातून जनआक्रोश समितीच्या सहकार्याने श्रमदान मोहीम राबविण्याचे काम हाती घेतले आहे.
या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याच्या उद्देशाने सुजाण नागरिक आणि जनआक्रोश समितीच्या सहकार्याने श्रमदान मोहीम राबविण्यात आली. कासू येथील पुलाची स्वच्छता करून नागरिकांनी या सामाजिक कार्यात हातभार लावला. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रायगडावरून मोठ्या संख्येने मावळे ‘शिवज्योत’ घेऊन येतात. त्यातील काही मावळे अनवाणी असतात. महामार्गावरील खडी त्यांच्या पायाला लागू नये, तसेच कोणालाही त्रास होऊ नये म्हणून ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. जर प्रत्येक गाव व विभागातील नागरिक असे सामाजिक प्रश्नांसाठी एकत्र आले, तर निश्चितच मोठे कार्य घडू शकते. यामुळे केवळ रस्ते स्वच्छ होतील असे नाही, तर नागरिकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीवही निर्माण होईल.
महामार्गावरील सुरक्षिततेसाठी आणि स्वच्छतेसाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, यासाठी जनजागृती आणि लोकसहभाग दोन्ही आवश्यक आहे. म्हणूनच, अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊन प्रत्येकाने समाजासाठी योगदान द्यावे असे अवाहन चैतन्य पाटील सुजाण नागरिक जनआक्रोश समिती यांनी केले आहे.