कर्जत /संतोष पेरणे : खोपोली-कर्जत ते मुरबाड-शहापूर या राष्ट्रीय महामार्गावर वंजारवाडी येथील परिसरात रस्त्याला मोठ मोठे खड्डे पडले आहेत.आधीचा रस्ता बुळबुळीत काँक्रिटच्या माध्यमातून बनवलेला आणि नंतर काही मीटर अंतरावर प्रचंड मोठ्या आकाराचे खड्डे यामुळे अपघाताची स्थिती निर्माण झाली आहे.दरम्यान राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून तब्बल दोन वर्षापासून रस्त्यावर तो भाग काँक्रिट न करण्याचे कारण समजून येत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
समृध्दी महामार्गाचे कर्जत लोणावळा कडे येणाऱ्या वाहनांसाठी शहापूर मुरबाड कर्जत खोपोली राष्ट्रीय महामार्ग बनविण्यात आला आहे.हा रस्ता 12 मीटर रुंदीचा बनविण्यात आला असून या रस्त्यावरील बहुसंख्य भाग अपवाद वगळता काँक्रिटचा बनला आहे.मात्र कर्जत तालुक्यातील दोन ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग डांबरी ठेवण्यात आला आहे.पळसदरी ग्रामपंचायत मधील वर्णे आणि कडाव ग्रामपंचायत मधील पेज नदी पुलाच्या आजूबाजूचा वंजारवाडी येथील रस्ता खड्डेमय डांबरी असून तेथे प्रचंड खड्डे यामुळे वाहनांना अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. वंजारवाडी पुलाच्या बाजूला कर्जत दिशेकडे असलेल्या आदिवासी वाडीच्या बाजूचा रस्ता मागील दोन वर्षापासून काँक्रिटच्या होण्याच्या प्रतीक्षेत आहे.त्या ठिकाणी डांबरी रस्त्यावर एक एक चारचाकी वाहन खड्ड्यात राहील एवढे मोठे खड्डे रस्त्यात तयार झाले आहेत.ते खड्डे खडी दगडाने भरण्याची तसदी देखील रस्ते विकास महामंडळ करण्याचा प्रयत्न करीत नाही.त्याचवेळी पेज नदीवरील वंजारवाडी पुलावर अत्यंत अरुंद भाग आहे आणि त्याच पुलावर मोठे खड्डे पडले आहेत.त्या खड्ड्यांमुळे वेगाने आलेली वाहने थेट नदी पात्रात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याशिवाय कर्जत कडून मुरबाड कडे जाणारा रस्ता हा काँक्रिटच्या माध्यमातून तयार आहे.पण वंजारवाडी आदिवासी वाडी येथील उतरणीचा भाग सुरू होतो त्यावेळी रस्ता डांबरी आणि खड्डेमय सुरू होतो.त्यामुळे वेगाने आलेली वाहने यांना खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यापुढे पुलावरील दोन मोठे खड्डे यात दुचाकीचे एक चाक अडकून बसेल एवढे मोठे खड्डे तेथे आहेत.मुरबाड बाजूने कर्जत दिशेला येणारे वाहन देखील पुलाच्या सुरुवातीला पडलेले खड्डे वाहनचालक यांना अपघात करतील अशा स्थितीत पडले आहेत.त्या भागातील रस्त्याचे काँक्रिटकरण करण्याची तयारी राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून दोन वर्षात करण्यात आली नाही.त्यामुळे हा रस्ता राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून अपघातग्रस्त ठेवण्यात आला आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील यांनी महामंडळावर केला आहे.