कर्जत/ संतोष पेरणे : तालुक्यात अजूनही गावकरी भाताची शेती करतात. भाताच्या शेतीचे उत्पन्न मिळण्याची वेळ आणि मे महिन्यात झालेला अवकाळी पाऊस यामुळे दुबार शेती वाया गेली आहे. दुबार शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान भाताचं पीक पाण्यात भिजल्याने झाले . अशा या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे करुन शासन दरबारी नुकसान भरपाई दिली जाते. मात्र नुकसान झालेल्या या शेतकऱ्यांच्या जमिनीचा पंचनामे होताना दिसत नाहीत. मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर मे अखेरपर्यंत अवकाळी पाऊस सुरु होता आणि त्यामुळे कर्जत तालुक्यातील भाताची सर्व शेत पाण्याने भरली असून अजूनही त्या भाताची लागवड करायच्या शेतात पाणी आणि गवत असल्याने बियाण्याची पेरणी कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कर्जत तालुक्यात दुबार शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यात राजनाला कालव्याचे पाण्यावर यावर्षी एक हजार हितकर जमिनीवर भाताची शेती केली होती. तालुक्यातील सहा पाझर तलाव आणि दोन लघुपाटबंधारे प्रकल्प यांच्या कालव्याच्या पाण्यावर देखील तालुक्याच्या विविध भागात दुबार शेती केली होती. या दुबार भाताच्या शेतीचा कापणी आणि मळणी हंगाम हा साधारण मे महिन्यात सुरु होतो. भाताचे पीक शेतात तयार झालेले असताना सहा मे पासून सबहुसांख्य ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आणि त्यामुळे भाताची पिकाची नासाडी झाली. मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम शेतीवर झाल्याचं दिसून येत आहे. पावसाच्या पाण्याने दुबार शेती पाण्याखाली गेल्याने बळीराजा संकाटात असल्याचं दिसून आलं आहे.
दुबार शेती केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी असल्याने भाताच्या पिकाची कापणी करण्यात अडचणी आल्या तर काही शेतकऱ्यांनी भाताचे पीक कापणी न करता तसेच सोडून दिले आहे.अवकाळी पावसाने दुबार भाताची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीबद्दल शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या नुकसानीची भरपाई मिळेल असे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी खरीप हंगाम आढावा बैठकीत जाहीर केले होते. मात्र तालुक्यातील दुबार शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसान पंचनामे झालेले नाहीत. त्यांच्याकडून कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केवळ सातबारा उतारे घेतले असून स्थळ पंचनामे करण्याची कोणतीही कार्यवाही कृषी विभागाने केलेली नाही अशी तक्रार राजनाला कालवा परिसरातील शेतकरी करीत आहेत.
पंचनामे करण्याची मागणी करून देखील कृषी तसेच महसूल विभाग कानाडोळा करीत असल्याने दुबार शेती करणारे कर्जत पूर्व भागातील शेतकरी हतबल झाले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात कोसळलेले आणि अवकाळी पावसाच्या पाण्याने कुजून पडलेले भाताचे पीक तसेच ठेवून दिले आहेत,मात्र पंचनामे होत नसल्याने शेतकरी नाराज आणि आर्थिक दृष्ट्या संकट आले आहेत.
अवकाळी पावसाने दुबार शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे,त्याचप्रमाणे खरीप हंगामात शेती करण्याची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात एक महिना आधी पडलेल्या पावसामुळे गवताने ती सर्व शेत व्यापली आहेत.त्याचवेळी मे अखेर पडणारे पाऊस यामुळे शेतांमध्ये साठून राहिलेले पाणी अजूनही कायम आहे. त्यामुळे भाताच्या बियाणे यांची लागवड कधी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे आहे. त्यात पाऊस पडून गेल्यानंतर जमीन ओली होते आणि त्या जमीनीचा वाफसा शेतकऱ्यांना भाताच्या बियाणे यांची पेरणी करण्यासाठी मदतगार ठरत असतो. त्यामुळे शेतामध्ये असलेले पाणी आटून जमीन सुकली नाहीतर मात्र खरीप हंगामात भाताची शेत करणे कठीण होऊन बसले आहे.
कृषी खात्याने आमचे जमिनीचे उतारे घेतले आहेत. मात्र अद्याप पंचनामे केले नाहीत,त्यामुळे आमच्या जमिनींचीमधील भाताच्या उतपन्नाचे झालेले नुकसान शासन भरपाई देणार आहे काय ? यावर्षी आमचे दुबार भाताचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे,आमहाला शासनाने मदत केली नाही तर आम्ही कर्जाच्या दरीत लोटले जाणार आहोत, असं स्थानिक शेतकरी दशरथ मुने यांनी नाराजी व्यक्त केली आहे.