कर्जत/ संतोष पेरणे : बंजारा समाज शिवसेना पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. विधानसभा निवडणुकीत बंजारा समाज आपल्या पाठीशी होता हे कदापि विसरू शकत नाही असे प्रतिपादन आमदार महेंद्र थोरवे यांनी केले.बंजारा समाजाच्या श्री जय अंबे मंदिराच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.कर्जत येथील सेवालाल नगरमध्ये असलेल्या जय अंबे मंदिराचा जिर्णोद्धार करणेसाठी शासनाने ८० लाखाचा निधी दिला आहे. त्याशिवाय त्या भागात स्वच्छतागृह उभारण्यासाठी १० लाखाचा निधी मंजूर असून या दोन्ही कामांचा शुभारंभ आमदार महेंद्र थोरवे यांचे हस्ते सेवालाल नगरात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.
सेवालाल जगदंबेमाता मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या दरम्यान काशी येथील बाबूसिंग जगतगुरु महाराज पवरा,शेखर महाराज पवरा जय सेवालाल जगदंब ट्रस्टचे पुनु महाराज ,कर्जत नगरपरिषदचे माजी स्वीकृत नगरसेवक ॲड. संकेत भासे आणि बंजारा समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते देविदास चव्हाण आदी प्रमुख उपस्थित होते.देविदास चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कर्जत आणि खालापूर मधील बंजारा समाज आमदार महेंद्र थोरवे यांच्या विकासकामांमुळे आनंदी असून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असून भविष्यात देखील आमदारांची साथ देणार असल्याचे जाहीर केले.
जय अंबे मंदिराचे भूमिपूजन करण्यात आल्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी सेवालाल नगर हे आपले कुटुंब असून बंजारा समाजाने शिवसेना पक्षाची कायम पाठराखण केली आहे.त्यामुळे या ठिकाणी मंदिर उभारणीसाठी निधी देवून थांबणार नाही तर या परिसराचा विकास व्हावा यासाठी एक कोटींचा निधी मंजूर करून आणण्याचे आश्वासन दिले. आपला समाज मेहनत करण्यासाठी ओळखला जातो आणि त्यामुळे राज्याच्या उभारणीत धाम गाळणाऱ्या समाजासाठी काहीतरी करता येत आहे याचा आनंद असल्याचे नमूद केले.
स्थानिक कार्यकर्ते पालिकेचे माजी स्वीकृत नगरसेवक संकेत भासे यांनी सेवालाल नगर परिसरात सांडपाणी व्यवस्थापन,रस्ते,पाणी आदी कामे पूर्ण करू शकलो असून आणखी एक स्वच्छता गृह उभारण्याची इच्छा यानिमित्ताने पूर्ण होत असून जय अंबे मंदिर उभारण्याचे सेवालाल नगरचे स्वप्न देखील पूर्ण होत असल्याचे आवर्जून सांगितले.