पेण: शेकापचा संवाद मेळावा संपन्न; उगवणारा सूर्य शेतकरी कामगार पक्षासाठी.... काय म्हणाले जयंत पाटील
पेण / विजय मोकल :- “उगवणारा सूर्य शेतकरी कामगार पक्षाचा आहे. कार्यकर्त्यांनी आता सावध राहून काम केले पाहिजे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय राऊत यांनी मिडिया समोर येऊन अलिबाग, पेण आणि पनवेलची जागा शेकापला सोडली गेली असून उरणच्या जागेबाबत बोलणे चालू असल्याचे घोषित केले होते. मात्र आयत्या वेळी शिवसनेने याच जागांवर आपले उमेदवार उभे करून आमच्याशी गद्दारी केली. यापुढे गद्दारी सहन केली जाणार नाही.” असा इशारा माजी आमदार जयंतभाई पाटील यांनी पेण येथे आयोजित शेकाप संवाद मेळाव्यात मार्गदर्शन करताना दिला आहे.
आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन आणि शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये काम करण्याचा उत्साह निर्माण करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने संपूर्ण रायगड जिल्हयात कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पेण तालुक्यातील आगरी समाज हॉल येथे पेणमधील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी आमदार जयंतभाई पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, शेकाप चिटणीस सुरेश खैरे, अतुल म्हात्रे, पी डी पाटील, सुप्रिया पाटील, ऍड मानसी म्हात्रे,प्रल्हाद पाटील, ऍड योगेश पाटील, मोहिनी गोरे, प्रकाश सिंगरुत, निलेश म्हात्रे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना भाई जयंत पाटील यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे गटावर नाराजी व्यक्त केली. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण व्हावे आणि त्यांना पुन्हा एकदा कामाला लागण्यासाठी त्यांना योग्य त्या सूचना देण्यासाठी आज पेणमध्ये हा कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे स्पष्ट करताना शेकापच्या जुन्या व नवीन कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचा सल्ला देताना दहा लोक असे घडवा ते दहा लाख घडवतील. आपल्या मध्ये राहून इतरत्र बसतात त्यांना खड्यासारखे बाजूला करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. पेण मध्ये शेकापने आमदार निवडून दिला तो त्याचे स्वार्थ साधून आपला पक्ष सोडून गेला. मात्र आता आजच्या तरुण कार्यकर्त्यांनी या गद्दारांना राजकारणातून हद्दपार करण्यासाठी सज्ज व्हा. प्रामाणिक कार्यकर्ता आणि निष्ठेने काम करणाऱ्या तसेच पक्ष न बदलणाऱ्या कार्यकर्त्यांनाच पदे द्या आशा प्रकरच्या सूचनाही त्यांनी दिल्या. भारतीय जनता पक्षावर टीका करताना भाई जयंत पाटील यांनी पूर्वीचा ओरिजनल भाजप आता राहिला नाही, आत्ताची जवळ्पास पंच्याहत्तर टक्के भाजप ही बाहेरील आमदारांनी भरलेली आहे अशी टिका केली.
जयंत भाईंच्या कार्यकर्त्यांना सूचना
आता पूर्वीचे राजकारण राहीले नसले तरी शेकापचा कार्यकर्ता हा पक्षाशी एकनिष्ठच राहिला पाहिजे. त्यामुळे नव्याने पद भरती करत असताना जे पक्षाशी एकनिष्ठ असतील आणि दलबदलू नसतील अशांनाच पदे द्या, ज्यांना आपण मोठे केले त्यांना धडा शिकवा, हा झालेला संवाद मेळावा व्यापक करा आणि एकत्रीत येऊन पक्ष मजबूत करा.
अतुल म्हात्रे यांच्यावर जयंत पाटील यांची स्तुतीसुमने
आपल्या पक्षाचे खजिनदार अतुल म्हात्रे यांच्या रूपाने आपल्याला एक प्रकाराचे वरदान लाभले आहे. पेण आणि उरण येथे होणाऱ्या तिसऱ्या मुंबईत आपल्या शेतकऱ्यांसाठी आणि प्रकल्पग्रस्तांसाठी त्यांचे मोलाचे योगदान आपल्याला लाभणार आहे. आपण सर्वांनी मिळून अतुल म्हात्रे यांना पाठबळ द्या आणि ठेकेदार म्हणून काम करणाऱ्यांना दुर ठेऊन एकदिलाने काम करा असे जयंत भाई पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करते वेळी सांगितले.