रायगड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी (फोटो- सोशल मीडिया)
रायगड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
वर्षभरात तब्बल ९४४ मोबाईल फोन्सचा घेतला शोध
रायगड पोलिस राज्यात ठरले अव्वल
अलिबाग: रायगड पोलिस दलाने सेन्ट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर पोर्टलचा वापर करत वर्षभरात हरवलेल्या ९४४ मोबाईल फोनचा शोध घेण्यात यश मिळवले आहे. हरवलेल्या मोबाईलचा शोध घेऊन ते संबधितांना परत करण्यात रायगड पोलिस राज्यात अव्वल ठरले आहेत.
मोबाईल फोन चोरीच्या वाढत्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र सरकारच्या टेलिकॉम विभागाने सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर अर्थात सीईआयआर पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलचा प्रभावीपणे वापर करत रायगड पोलिस दलाने हरवलेल्या आणि चोरीला गेलेल्या मोबाईल फोन्सचा तपास सुरू केला आहे. बुधवारी रायगड पोलिस दलाच्या सायबर सेलने २४ जणांना त्यांचे हरवलेले फोन परत केले. यावेळी पोलिस अधीक्षक आँचल दलाल, अप्पर पोलिस अधीक्षक अभिजीत शिवथरे, सायबर सेलच्या प्रमुख रिझवाना नदाफ उपस्थित होत्या.
१,७१९ मोबाईल हरवल्याच्या तक्रारींची नोंद
गेल्या १० महिन्यांत रायगड पोलिस दलाच्या हद्दीत १ हजार ७१९ मोबाईल फोन हरवल्याच्या तक्रारींची नोंद झाली होती. यातील १ हजार ४० मोबाईलचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. महत्त्वाची बाब म्हणजे यातील ९४४ मोबाईल फोन संबधित तक्रारदारांना परत मिळवून देण्यात आले आहेत.
मोबाईल चोरी झल्यास तत्काळ ‘सीईआयआर ‘वर तक्रार नोंदवावी
दरम्यान, नागरिकांनी मोबाईल फोन हरवल्यास अथवा चोरीला गेल्यास तत्काळ सीईआयआर पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक आँचल दलाल यानी केले आहे. भारत सरकारने मोबाईल चोरी किंवा हरवण्याच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करण्यासाठी आणि गहाळ झालेले मोबाईल त्यांच्या मालकांना परत मिळवून देण्यासाठी https://www.ceir.gov.in हे ऑनलाइन पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलवर हरवलेल्या किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलची ऑनलाइन तक्रार नोंदवता येते. त्यानंतर पोलिस विभागाकडून तांत्रिक पद्धतींनी मोबाईलचा शोध घेऊन तो संबंधितांना परत केला जातो. देशात या पोर्टलवर ४१ लाख ४६ हजार मोबाईल फोन हरवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ज्यातील २५ लाख ७१ हजार मोबाईल फोनचा शोध घेण्यात यश आले आहे.
तपासकामातील सातत्यामुळे मिळाले यश
तपासकामातील सातत्य है या यशामागील महत्त्वाचे कारण ठरले आहे. मोबाईलचोरीच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी जिल्हास्तरावर सहा, पोलिस निरीक्षक अमोल जाधव, सहा फौजदार अजय मोहिते, पोलिस हवालदार श्रेयस गुरव, सुचिता पाटील, राजीव झिंगुर्डे यांचे पथक नियुक्त करण्यात आले होते. याशिवाय प्रत्येक पोलिस द्वाणे स्तरावर विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली.






