अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातुन महायुतीचे उमेदवार डॉ.बालाजी किणीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सलग तीन वेळा शिवसेनेतून निवडून आलेले आमदार किणीकर हे यंदा चौथ्यांदा शिवसेना शिंदे गटातून निवडणूक लढवत आहेत. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती करिता राखीव असून महायुतीचे उमेदवार म्हणून किणीकरांना चौथ्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विद्यमान आमदार किणीकर यांनी महायुतीच्या शेकडो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. अंबरनाथ विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत जोशी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत कल्याण जिल्हा प्रमुख गोपळ लांडगे, शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील, बदलापूर शहर प्रमुख वामन म्हात्रे, उल्हासनगर महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर उपस्थित होते.
अंबरनाथ मतदारसंघात चुरशीची लढत
अंबरनाथ मतदारसंघामध्ये गेल्या निवडणूकीत डॉ. बालाजी किणीकर यांच्या विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे राजेश वानखडे हे उमेदवार आहेत. राजेश वानखडे यांनी 2014 साली आमदार बालाजी किणीकर यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती. त्यामध्ये अवघ्या 3 हजारा मतांनी वानखडे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर वानखडे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाने त्यांना या विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी जाहीर केल्याने अंबरनाथमध्ये चुरशीची लढत होणार आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला
1978 साली हा मतदारसंघ अस्तित्वात आला. पहिल्या निवडणूकीत जनता पार्टीचे उमेदवार येथून निवडून आले त्यानंतरच्या काळात काळात या मतदारसंघामध्ये कॉंग्रेसचे वर्चस्व होते. मात्र 90 च्या दशकात शिवसेनेच्या झंझावातात हा मतदारसंघ ही शिवसेनेने जिंकला. शिवसेनेचे माजी मंत्री साबीर शेख यांनी 1990, 1995, 1999 असा सलग तीन वेळा अंबरनाथमधून विजय मिळवला होता. त्यानंतर 2004 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या किसन कथारे यांनी साबीर शेख यांचा काही हजारांच्या मतांनी पराभव केला आणि राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला.
अंबरनाथकरांचा कौल कोणत्या शिवसेनेला
2009 च्या निवडणूकीमध्ये बालाजी किणीकर यांनी विजय मिळवत शिवसेनेकडे हा मतदारसंघ पुन्हा खेचून आणला. सलग तीन निवडणूकांमध्ये त्यांनी विजय झाल्याने हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला बनला. मात्र 2022 मध्ये झालेल्या शिवसेना फुटीमुळे या मतदारसंघात नेमक्या कोणत्या शिवसेनेला अंबरनाथकर कौल देणार हे या निवडणूकीत ठरणार आहे. लोकसभा निवडणूकीमध्येही या मतदारसंघातून ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना चांगली मते मिळाली होती. विशेष म्हणजे अंबरनाथ मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघात येत असल्याने त्यांचेही या मतदारसंघात विशेष लक्ष आहे.