संग्रहित फोटो
सांगली / प्रवीण शिंदे : गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात पावसाने (Rain in Sangli) दडी मारली आहे. त्यामुळे खरीप पेरण्या रखडल्या आहेत, अशी परिस्थिती असली तरी गेल्या दोन दिवसांपासून कोयना आणि वारणा धरण क्षेत्र तसेच धरणाखालील भागात पावसाने जोर धरलेला असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.
बुधवारी रात्री झालेल्या पावसानंतर सकाळी कृष्णा नदीवरील म्हैसाळ बंधारा पाण्याखाली गेला. तर सकाळी साडेदहा वाजेपर्यंत वारणा नदीवरील दुधगाव बंधारा देखील पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, वारणा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी गुरुवारी दुपारपर्यंत 15 फूट इतकी होती.
पूर्व भागात पावसाची प्रतीक्षा
धरण क्षेत्र परिसरात जोरदार पाऊस पडत असला तरी पूर्व भागात अद्याप पुरेसा पाऊस पडलेला नाही. जत,कवठेमहांकाळ,आटपाडी, तासगाव तालुक्यात तर दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या झाल्या नाहीत. थोड्याफार पावसावर ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत, त्यांचे पीक वाया गेले आहे.
जिल्ह्यात पाऊस असा
जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १०. ०९ मि. मी. पावसाची नोंद झाली असून, शिराळा तालुक्यात सर्वाधिक ४१ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या २४ तासात पडलेला पाऊस व कंसात १ जूनपासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे…
मिरज ५. ९ (८९.९), जत १.१ (७१.७), खानापूर-विटा ५ (६६.१), वाळवा-इस्लामपूर १८.४ (१०२), तासगाव ६.९ (१०६.६), शिराळा ४१ (२८८.५), आटपाडी १ (६५.५), कवठेमहांकाळ २.१ (७३.१), पलूस १४.२ (८२.९), कडेगाव ९.७ (७८.२).