राज ठाकरेंच्या आदेशाची रत्नागिरीत अंमलबजावणी ! मराठी भाषेच्या वापराबाबत कार्यकर्त्यांकडून प्रमुख बँकांना निवेदन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष रुपेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीतील प्रमुख बँकांना दैनंदिन कामकाज मराठीतच करण्याचे ठणकावून सांगण्यात आले. बँकेच्या व्यवस्थापकांना याबाबत निवेदन देण्यात आले, तसेच अमराठी बँक कर्मचाऱ्यांना मराठी शिकण्याचे निर्देश देण्यात आले. त्यासाठी मनसेतर्फे त्यांना “बाराखडी” प्रदान करण्यात आली. मराठी भाषेचा सन्मान राखण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला असून, बँक ग्राहकांना त्यांच्या मातृभाषेत सेवा मिळावी, हा यामागील उद्देश आहे. मनसेच्या या कृतीमुळे मराठी भाषा आणि तिच्या सन्मानासाठी उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला शिवतीर्थावर केलेल्या भाषणात महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषाच चालणार अन्य भाषा चालणार नाही, असे ठणकावून सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक आस्थापनेमध्ये मराठी भाषा सक्तीने वापरलीच पाहिजे, असे सक्त आदेश काढले आहेत; मात्र तरीही महाराष्ट्रातील विविध आस्थापनांमध्येदेखील मराठीचा वापर होताना दिसत नाही.
Raigad Rain : रायगड जिल्ह्याला अवकाळीने झोडपलं; माथेरानमध्ये रिमझिम पावसाची हजेरी
या पार्श्वभूमीवर रत्नागिरी तालुका मनसे तर्फे प्रमुख बँकांमध्ये जाऊन तेथील अधिकारी कर्मचाऱ्यांची भेट घेण्यात आली. बँकांच्या व्यवहारांमध्ये जास्तीत जास्त मराठीचा वापर करण्यात यावा. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी देखील ग्राहकांशी मराठीत संवाद साधावा ,याबाबत शांततापूर्ण निवेदन देऊन आग्रही मागणी करण्यात आली. याप्रसंगी मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष रुपेश जाधव, तालुका सचिव ॲड अभिलाष पिलणकर, तालुका उपाध्यक्ष राजू पाचकुडे, सौरभ पाटील, महिला सेना तालुका सचिव आकांक्षा पाचकुडे, विभाग अध्यक्ष अक्षय मोरे, जयेश फणसेकर, सोम पिलणकर, प्रफुल्ल पेडणेकर आदी रत्नागिरी तालुका मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.