रायगड /संतोष पेरणे/ विजय मोकल : कर्जत तालुक्यात आज सायंकाळी आलेल्या अवकाळी पावसाने सर्व भागाला झोडपले असून वातावरणात चांगला गारवा निर्माण झाला आहे. माथेरान मध्ये तब्बल दोन तास पावसाची रिमझिम सुरू होती आणि त्यामुळे परिसरात आणखी गारवा निर्माण झाला आहे.आज दुपार पासून वातावरण थंडगार वाऱ्याची झुळूक आणि सोबत ढगाळ वातावरण यामुळे सायंकाळच्या वेळी अवकाळी पाऊस हजेरी लावणार अशी अटकळ बांधली जात होती.गेली चार दिवस वातावरणात ढगाळ होते आणि त्याचा परिणाम उष्णतेचे प्रमाण वाढले होते.
हवामान उष्ण झाल्याने सर्वांना अवकाळी पावसाचा शक्यता वाटत होती. त्यात चार वाजण्याच्या सुमारास ढग देखील गडगडू लागले होते आणि त्यामुळे अवकाळी पाऊस हजेरी लावणार असे वातावरण तयार झाले.शेवटी काही वेळातच कर्जत तालुक्याच्या बहुसंख्य भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आणि वातावरणात थंडगार केले.मात्र या अवकाळी पावसाने कर्जत तालुक्यातील विट भट्टी उत्पादक यांचे मोठे नुकसान झाले असून बनवून ठेवलेल्या विटांवर पाण्याचे थेंब पडल्याने मोठया प्रमाणावर विटा खराब झाल्या असून त्या पुन्हा बनविण्याची वेळ व्यवसायिक यांच्यावर येणार आहे.त्रा भाजीपाला पीक घेणारे शेतकरी यांना देखील अवकाळी पिकाचा त्रास होणार आहे.यावर्षी आंबा पीक काही प्रमाणात तयार झाले असल्याने आजच्या अवकाळी पावसाने फार नुकसान शेतकऱ्यांचे होणार नाही असे कृषी विभाग सांगत आहे.
माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.त्यात दीड ते दोन तास पाऊस सुरू होता.माथेरान शहरातील सर्व भागात पावसाची रिमझिम सुरू होती आणि त्यामुळे पावसाने माथेरान मधील काही दिवस ढगाळ हवामानामुळे वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत झाली आहे.आज मोठ्या प्रमाणात पर्यटक नव्हते मात्र जे पर्यटक माथेरान शहरात होते त्यांनी अवकाळी पावसाचा भिजून आनंद घेतला.
पेणमध्ये अवकाळी पावसाच्या सरी जोरदार बरसल्याने पेणकारांची तारांबळ उडाल्याचे चित्र दिसत होते.
पेण तालुक्यात अवकाळी पावसाने शेती आणि फळबागांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी आणि फळबागायतदारांची चिंता वाढली आहे.
अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी शेतीमधील पीक खराब झाले आहे, तर काही ठिकाणी मळणीसाठी ठेवलेले पीक भिजल्याने नुकसान झाले आहे.
पेण तालुक्यात आंबा आणि काजू यांसारख्या फळबागांवर ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा परिणाम होत आहे. ज्यामुळे कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
अवकाळी पावसामुळे वीटभट्टी आणि बांधकाम व्यवसायावरही परिणाम झाला आहे. हवामान ढगाळ झाल्याने आंबा आणि काजू फळ उत्पादन धोक्यात आले आहे, त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या आंबा, भाजीपाला, वीटभट्टी, मिठागरे आणि बांधकाम व्यवसायाला फटका बसला आहे. रायगड जिल्हासह राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरीने बरसल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये हवामान विभागाकडून पाच ते सात एप्रिलदरम्यान यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याकडून मुंबईसाठी पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचे असणार असून काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे.पेण तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरात वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. पूर्व विभागातील दुबार शेती पिकाचं मोठं नुकसान झाले आहे. मीठ व्यावसायीक वीट व्यावसायिक यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.