फोटो सौजन्य- सोशल मीडिया
राजापूर लांजा साखरपा विधानसभा निवडणुकीत महायुतीचे किरण सामंत यांनी महाविकास आघाडीच्या राजन साळवी यांचा १९९७४ मतांनी पराभव केला. राजन साळवी यांना पराभूत करून किरण सामंत यांनी कोकणात उबाठाप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिलेला हा मोठा धक्का आहे. राज्यात व कोकणातील जनतेने महायुतीला भरभरून प्रतिसाद दिला असून त्याचे फलीत म्हणून राजापूर लांजा साखरपा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांच्या पदरात पडलेले मताधिक्य आहे. राजापूर मतदारसंघात किरण सामंत यांना 80256 मते मिळाली तर ठाकरे गटाचे राजन साळवी यांना 60579 मते मिळाली. कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार अविनाश लाड यांना 7945 मते मिळाली.
किरण सामंत यांची प्रतिक्रिया
विकासाचा अजेंडा घेऊन किरण सामंत यांनी ही निवडणूक लढवली. लांजा राजापूर साखरपा मतदारसंघातील जनतेने भावनिक राजकारणाला नाकारून विकासाची साथ दिली त्यामुळे माझा विजय झाला. या विजयात महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा, मतदारांचा मोलाचा वाटा आहे. या सर्वांच्या ऋणात मी कायम राहू इच्छितो. असे किरण सामंत म्हणाले मतदारसंघाच्या विकासासाठी माझ्यावरती जनतेने दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवेन, ही प्रतिक्रिया किरण सामंत यांनी दिली.
राजापूर मतदारसंघ
महाराष्ट्र राज्याच्या 1962 मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीपासुन हा मतदारसंघ अस्तित्वात आहे. या मतदारसंघावर सुरुवातीच्या काळात कॉंग्रेस आणि जनता दलाचा वरचष्मा राहिला होता. मात्र 1995 पासून या राजापूर मतदारसंघामध्ये शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. तब्बल 30 वर्षे येथे शिवसेनेचा आमदार निवडून येत आहे. 1995 च्या विधानसभा निवडणूकीत विजय साळवी यांनी विजय मिळवला. त्यानंतरच्या काळात 1999 आणि 2004 च्या निवडणूकीमध्ये गणपत कदम यांनी विजय मिळवला. मतदारसंघातून 2009 पासून या मतदारसंघातून सलग तीन वेळा राजन साळवी यांनी विजय मिळवत हॅट्ट्रीक केली होती मात्र या निवडणुकीत त्यांना किरण सामंत यांनी जबरदस्त धक्का देत पराभूत केले आहे.
राज्याचा निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागले असून आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार राज्यात महायुतीचा झंझावात पाहायला मिळत आहे.महायुतीतील प्रमुख घटक पक्षांना एकत्रित रित्या 230 जागा मिळाल्या आहेत. 132 जागांवर आघाडी मिळवत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपचे हे यश आजपर्यंतचे सर्वात मोठे यश ठरले आहे. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने तब्बल 57 जागा आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाने 41 जागावर आघाडी मिळवली आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष शिवसेना ठाकरे गटाला 20 तर कॉंग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे या निकालामुळे महाविकास आघाडी पूर्णपणे नेस्तनाबूत झाल्याचे दिसून येत आहे.