या मंदिराचंदेखील एक रहस्य आहे. पावशीमधील ही देवी चक्क वारुळातून अवतरली असं म्हटलं जातं. या देवीच्या मंदिराची एक दंतकथा सांगितली जाते. याबाबतची माहिती सोहम रांगणेकर या व्लॉगर इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन देण्यात आली. गावकऱ्यांनी सांगितलेल्या आख्यायिकेनुसार, सुमारे 700 वर्षांपूर्वी पावसगावात एक गुढ घटना घडली होती. ज्या ठिकाणी सातेरी देवीचं मंदिर आहे तिथे कधी काळी एक घर होतं. त्या घरातल्या स्वयंपाक घरात वारुळ तयार व्हायचं. घरातल्या मंडळींनी हे वारुळ काढून टाकलं. मात्र पुन्हा पुन्हा सतत हे वारुळ यायला लागलं. एकेदिवशी असचं वारुळ काढताना ते वारुळ माणसाच्या उंचीपेक्षाही मोठं झालं. ही घटना सामान्य नव्हती यामागे काही देैवी कारण होतं हे तिथल्या घरातील कुटुंबाला कळून आलं. या वारुळाची उंची इतकी की, ते तब्बल 20 ते 25 फूट उंच वाढलं. हे वारुळ पाडणं देखील शक्य झालं नाही.
स्वयंपाक घरातील हे वारुळ जेव्हा मोठं झालं त्यावेळी सातेरी देवीने कुटुंबातील सदस्यांना दृष्टांत दिला. त्यानंतर ही खबर गावात परसली. वैशाख महिन्यात याठिकाणी सातेरी देवीची जत्रा भरते. आजही या ठिकाणी देवीच्या मंदिरात वारुळ दिसतं. हे वारुळ आजही 20 ते 25 फूट उंच आहे. वारुळात देवी वास करते म्हणून नित्यनेमाने या वारुळाची पूजा केली जाते. गावकऱ्यांची श्रद्धा अशी की आजही या वारुळात देवी वास करते. जत्रेच्या वेळी गावकरी तांदळाच्या पेजेने हे वारुळ स्वच्छ करतात. त्यानंतर त्याची रिसतर पूजा करतात. गावचं रक्षण करणारी ही देवी म्हणून हे जागृत देवस्थान असल्याचं म्हटलं जातं.






