पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात यापुढे एकही अनधिकृत होर्डिंग (Illegal Hoarding) उभारु देऊ नका, सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडीट (Structural Audit) करावे. शहराचे विद्रुपीकरण करणारे होर्डिंग तत्काळ काढावेत. त्यांची परवानगी रद्द करावी. आकाश चिन्ह व परवाना विभागात मोठा भ्रष्टाचार, गैरप्रकार होत आहे. या विभागात वर्षानुवर्षे काम करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांची दुसऱ्या विभागात बदली करावी, अशी सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी महापालिका आयुक्तांना केली.
किवळेतील दुर्दैवी घटनेनंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी शहरातील अनधिकृत होर्डिंग संदर्भात आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत बैठक घेतली. 433 अनधिकृत होर्डिंगबाबत तत्काळ सुनावणी घेण्याची न्यायालयाला विनंती करावी. याव्यतिरिक्त 72 नव्याने अनधिकृत होर्डिंग आढळून आले आहेत. त्या होर्डिंगवर तत्काळ कारवाई करावी. काही जाहिरात व्यावसायिकांनी परवानगीपेक्षा मोठ्या आकाराचे होर्डिंग उभारले आहेत. शहरातील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. परवानगीपेक्षा मोठा होर्डिंग उभारणाऱ्यांवर कारवाई करावी.
होर्डिंगला परवनागी देताना शहराचे विद्रुपीकरण होणार नाही याची खबरदारी घ्यावी. परवानगी देण्यासाठी नवीन प्रणाली आणावी. आकाश चिन्ह व परवाना विभागात मोठा भ्रष्टाचार, गैरप्रकार होत आहे. या विभागात वर्षानुवर्षे काम करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांची दुसऱ्या विभागात तत्काळ बदली करावी. या विभागाचा आयुक्तांनी दर तीन महिन्यांनी आढावा घ्यावा. शहराचे विद्रुपीकरण करणारे होर्डिंग काढावेत. त्यांची परवानगी रद्द करावी. विद्रुपीकरण होईल, अशा ठिकाणी होर्डिंग उभारण्यास परवानगी देऊ नये. केवळ व्यावसाय म्हणून या विभागाकडे पाहू नये. आवश्यक ठिकाणीच होर्डिंग उभारण्यास नियमाप्रमाणे परवानगी द्यावी, अशी सूचनाही खासदार बारणे यांनी केली.