विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका! कल्याणच्या शाळेमध्ये दुरुस्तीचे बांधकाम सुरु, केडीएमसीचा कारवाईचा इशारा (फोटो सौजन्य-X)
कल्याण : कल्याण पश्चिमेतील रामबागेतील आदर्श हिंदी शाळेच्या इमारतीचा काही भाग धोकादायक झाल्याने तो दुरुस्ती करण्यात यावा अशी नोटीस कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी बजावली होती. शाळेच्या इमारतीची दुरुस्ती सुरु आहे. मात्र हे काम करण्यात येत असलेले काम थातुरमातुर प्रकारे केले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. तसेच दुरुस्तीचे काम कायदेशीर नसेल तर वरिष्ठाच्या पुढील आदेशानुसार शाळेच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा सहाय्यक आयुक्त प्रिती गाडे यांनी शाळा प्रशासनाला दिला आहे.
कल्याणमधील आदर्श हिंदी शाळेच्या इमारतीची काही भाग धोकादायक झाल्याने मुंबईतील वीजेटीआय या संस्थेकडून स्ट्रक्चर ऑडीट करण्यात आले आहे. या अहवालानुसार शाळेच्या इमारतीचा धोकादायक भागाची दुरुस्ती १५ दिवसांच्या आत करणे आवश्यक असल्याचे महापालिकेने शाळेला कळविले होते. त्यानंतर महापालिकेने त्याठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यावेळी दुरुस्तीचे काम केले नसल्याचे आढळून आल्यानंतर ही गंभीर बाब आहे. शाळेच्या इमारतीचा धोकादायक भाग कोसळून जिवित हानी होऊ शकते. विद्यार्थ्यांचा जीवाला धोका उद्धव शकतो. त्यामुळे महापालिकेने धोकादायक भाग पाडून शाळा वापरास प्रतिबंध करण्यात आला. त्या उपरही काही घटना घडल्यास त्यासाठी शाळा व्यवस्थापनास जबाबदार धरले जाईल अशी नोटीस सहाय्यक आयुक्त गाडे यांनी शाळेला बजावली होती.
शाळेच्या धोकादायक भागाच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने शाळेला मुदतही दिली होती. धोकादायक भाग पाडून त्याची दुरुस्ती करण्यात यावी असे शाळेला बजावले होते. त्याठिकाणी प्रशासनाने भेट दिली असता शाळेने बांधकामाचा कोणताही प्लान सादर न करता दुरुस्तीचे काम सुरु केले आहे. करण्यात येणारी दुरुस्ती देखील थातुरमातुर आहे. हे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. शाळेने सुरु केलेले दुरुस्तीचे काम कायदेशीर नसेल तर वरिष्ठांच्या पुढील आदेशानुसार कारवाई करण्यात येईल असे सहाय्यक आयुक्त गाडे यांनी स्पष्ट केले आहे.