बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये (Baramati Lok Sabha) बारामती व इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मतदारांना जात व धर्म बघून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी माध्यमांशी बोलताना केला. पैसे वाटपासाठी पुणे जिल्हा बँक देखील रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात आल्याचा धक्कादायक आरोप देखील आमदार रोहित पवार यांनी केला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा आरोप फेटाळला आहे.
यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले, शहरी भाग असणारा खडकवासला, हवेली या ठिकाणी देखील पैशाचे वाटप विरोधकांनी केले. बारामतीमध्ये कधी मतदानासाठी पैशाचे वाटप केले जात नव्हते. मात्र, त्या ठिकाणी देखील पैशाचे वाटप करण्यात आले. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मतदारांना पैसे वाटप करण्यात आले. मतदारांना प्रत्येकी दोन हजार, तीन हजार ते ५,००० पर्यंत जात व धर्म बघून पैसे वाटप करण्यात आले. वास्तविक, पाहता अनेक ठिकाणी मतदारांनी हे पैसे नाकारले. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने विजय होतील, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गरिबांसाठी पाच वाजता बंद होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत पैसे वाटपासाठी ही बँक सुरू होती, असा आरोप देखील रोहित पवार यांनी यावेळी केला. बारामती पाणी इंदापूरमध्ये पैसे वाटप होत असल्याबाबत काही नागरिकांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, पोलीस त्याकडे बघूनही दुर्लक्ष करत होते. पोलीस गाड्यांचा वापर पैसे वाहतुकीसाठी झाला का काय, याची देखील माहिती घ्यावी लागेल असे आमदार रोहित पवार म्हणाले.