बारामती : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यसभेला अजित पवार गटाकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आली आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभेमध्ये रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक आहे. त्यासाठी उमेदवार देण्याबाबत अजित पवार गटामध्ये अनेक चर्चा झाल्या. त्यानंतर आज उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस असताना सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावरुन राजकीय वर्तुळात जोरदार रंगलेली असून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी टोला लगावला आहे.
काय आहे रोहित पवार यांची पोस्ट?
अजित पवार गटाकडून राज्यसभेची उमेदवारी सुनेत्रा पवार यांना देण्यात आल्यामुळे शरद पवार गटाने टीकेची झोड उठवली आहे. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत खोचक टीका केली. रोहित पवार यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आदरणीय पवार साहेबांना सोडून एक वेगळं घर वसवलं गेलं असलं तरी त्या घरातील आजची परिस्थिती आणि तिथल्या लोकांची अस्वस्थता बघता सर्वजण किती दिवस एकत्र राहतील हे ब्रम्हदेवही सांगू शकणार नाही.. त्यामुळं पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरातल्या विश्वासू व्यक्तीला दिली तरच ती टिकेल इतरांचा काही भरवसा नाही, अशी चर्चा सुरूय… म्हणूनच सुनेत्राकाकी किंवा पार्थ यांना Advance मध्ये शुभेच्छा आणि अभिनंदन!!!” असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.
आदरणीय पवार साहेबांना सोडून एक वेगळं घर वसवलं गेलं असलं तरी त्या घरातील आजची परिस्थिती आणि तिथल्या लोकांची अस्वस्थता बघता सर्वजण किती दिवस एकत्र राहतील हे ब्रम्हदेवही सांगू शकणार नाही.. त्यामुळं पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरातल्या विश्वासू व्यक्तीला दिली तरच ती…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 12, 2024
लोकसभेनंतर आता राज्यसभा
लोकसभा निवडणुकीसाठी बारामती मतदारसंघामध्ये अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे ही पवार कुटुंबातील दोन उमेदवारांमध्ये प्रतिष्ठेची लढाई झाली. मात्र सुप्रिया सुळे यांनी लाखांच्या मतांनी बारामतीचा गड राखला. यानंतर आता सुनेत्रा पवार या मागच्या दाराने संसदेमध्ये जाणार आहेत. लोकसभेमध्ये पराभूत झाल्या असल्या तरी सुनेत्रा पवार या राज्यसभा खासदार होणार आहेत.