सांगली महानगरपालिकेचे बजेट सादर
या अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ, दरवाढ केलेली नाही. महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी महापालिका मालकीच्या खुल्या भूखंडांच्या विकसनासाठी मालमत्ता रोखीकरण हे धोरण प्रस्तावित केले आहे. मॉडेल स्मार्ट स्कूल, पर्यावरण रक्षण व संवर्धन, भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर निर्बीजीकरण व निवारा केंद्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगळा केंद्र, लक्ष्मी नारायण त्रिपाठी तृतीयपंथी सक्षमीकरण योजना, मॉडेल स्मार्ट स्कूल योजना, ई – ऑफिस प्रणाली, ट्रिमिक्स रस्ते, प्रधानमंत्री ई-बस सेवा, राजमाता जिजाऊ सदृढ माता सकस आहार योजना, क्षयरोग निर्मुलन एक्स रे मोबाईल व्हॅन, पाणीपुरवठा ऑडिट, पार्किंग सुविधा, नवीन डीपी रस्ते यावरील तरतूद हे या अंदाजपत्रकातील ठळक बाबी आहेत.
महापालिकेचे 2024-25 चे 1092.60 कोटी रुपये अंतिम सुधारित आणि सन 2025-26 चे 1132.93 कोटी रुपये मूळ अंदाजपत्रक मुख्य लेखाधिकारी अभिजीत मेंगडे यांनी शुक्रवारी प्रशासकीय स्थायी समिती सभेत प्रभारी आयुक्त तथा प्रशासक निलेश देशमुख यांच्याकडे सादर केले. त्यानंतर प्रभारी आयुक्त निलेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय महासभा झाली. या महासभेत या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त वैभव साबळे, उपायुक्त शिल्पा दरेकर, उपायुक्त विजया यादव, उपायुक्त उपायुक्त स्मृती पाटील, मुख्य लेखाधिकारी अभिजीत मेंगडे उपस्थित होते.
शहराचा विकास होत असताना पर्यावरणावर होणार्या परिणामांचा व त्याकरिता लागणार्या सकारात्मक उपाययोजनांचा अभ्यास याचा अहवाल तयार केला जाणार आहे. या अहवालाची अंमलबजावणी करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी 10 लाख रुपयांची तरतूद केली आहे. वृक्ष संवर्धनासाठी प्रथम अस्तित्वातील वृक्षांची गणना होणे, वृक्षांची स्थिती समजणे आवश्यक असते. कायद्याने पाच वर्षातून एकदा वृक्षगणना करणे अभिप्रेत आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात ड्रोनद्वारे वृक्षगणना केली जाणार आहे. यावर्षी हे काम पूर्ण केले जाईल. वृक्षसंवर्धन, अनधिकृत वृक्ष तोडीवर आळा, नवीन वृक्षारोपणास मदत यासाठी 2 कोटींची तरतूद केली आहे.
ज्येष्ठांचे जीवन सुसह्य करण्याच्यादृष्टीने महापालिका विविध उपाययोजना करत आहे. आयुष्यातील काही क्षण निवांत घालवता यावेत, आयुष्याचा उत्तरार्ध सुखकर व्हावा यासाठी महापालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्रे उभारली जाणार आहेत. त्यासाठी 15 लाखांची तरतूद केली आहे. तृतीयपंथीयांचे सक्षमीकरण करण्याचा संकल्प महापालिकेने केला आहे. त्यासाठी लक्ष्मीनारायण त्रिपाठी तृतीयपंथी सक्षमीकरण योजना राबविली जाणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रका 5 लाख रुपयांची टोकण तरतूद केली आहे. गरजेनुसार तरतूद वाढविली जाणार आहे.
महापालिका शाळांना नवीन वर्गखोल्या, इमारत दुरुस्ती, क्रीडांंगण विकास, ग्रंथालय, बोलक्या भिंती, कुंपनभिंत, शुद्ध पाणी, विविध शैक्षणिक उपक्रम, स्पर्धात्मक परीक्षेसाठी विशेष तयारी करणे, डिजिटल स्कूल, स्मार्ट लॅबोरेटरी व अन्य उपक्रमांसाठी 5 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सदृढ माता आणि बालकांसाठी संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे आवश्यक असते. लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि प्रथिने यासारख्या पोषक तत्त्वांचा समावेश असला पाहिजे. माता आणि बालकांच्या आरोग्यासाठी योग्य आहार घेतल्यास ते निरोगी राहतात. त्यासाठी अंदाजपत्रकात टोकन तरतूद केली आहे.