खाजगी कंपनीत मोठी दुर्घटना; ड्रेनेज टाकीत गुदमरून तिघांचा मृत्यू, पाच जण जखमी
ईश्वरपूर : वाळवा तालुक्यातील पेठ गावच्या हद्दीत एपीके यान्स प्रा. लि. या खाजगी कंपनीत ड्रेनेजच्या टाकीत साफसफाई करण्यासाठी उतरलेल्या तिघा कामगारांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला. सफाई करणारे दोघे व त्यांना वाचवायला गेलेल्या एकाचा यात मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेत त्यांना वाचवण्यासाठी टाकीत उतरलेल्या आणखी पाच जणांना गंभीर दुखापत झाली. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
या दुर्घटनेत विशाल सुभाष जाधव (वय ३०), सचिन तानाजी चव्हाण (वय ३९, दोघे रा. विजयगड अपार्टमेंट, बेघर वसाहत, ईश्वरपूर) आणि सागर रंगराव माळी (वय २५, रा. पेठ, ता. वाळवा) यांचा मृत्यू झाला. दरम्यान, महादेव रामचंद्र कदम (वय ४०, रा. महादेववाडी), विशाल मारुती चोगुले (वय २४, रा. ईश्वरपूर), केशव आनंदा साळुंखे (वय ४५, रा. निगडी, ता. शिराळा), हेमंत शंकर धनवडे (वय २७, रा. ओझर्डे, ता. वाळवा) आणि सुनील आनंदा पवार (वय २९, रा. रेठरेधरण, ता. वाळवा) हे पाच जण जखमी झाले आहेत.
एपीके यान्स कंपनीच्या ड्रेनेजची साफसफाई सुरू होती. येथे ठेकेदाराकडून ही स्वच्छता होते. त्यांचे कामगार विशाल सुभाष जाधव, सचिन चव्हाण हे टाकीत उतरले. मात्र, टाकीतील विषारी वायूमुळे त्यांना चक्कर येऊन ते आतच कोसळले. ते हातपाय हलवत होते. काही तरी आवाज आल्याने पाणी आणायला जाणाऱ्या कामगारांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी काय झाले म्हणून टाकीत वाकून पाहिले तेव्हा दोघे आत निपचिप पडले होते. ऑक्सिजनअभावी गुदमरून बेशुद्ध पडले.
टाकीत उतरताच प्रकृती खालावली
त्यानंतर मदतीसाठी धाव घेतलेल्या सागर माळी यांनीही टाकीत उतरताच त्यांची प्रकृती खालावली. यावेळी हेमंत धनवडे व केशव साळुंखे आतील कामगारांना वाचवण्यासाठी खाली उतरले. तेही बेशुद्ध पडले. नेमका काय प्रकार लक्षात येण्याआधी तेथे आणखी कामगार आले. सर्वांनी आतील लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न चालू केले.
सहा जणांना काढले बाहेर
सुनील आनंदा पवार या तरुणाने धाडसाने शिडी लावली आणि टाकीत गेले. खाली बेशुद्ध पडलेल्या सर्वांच्या कमरेला दोरी बांधली एक बाजू टाकी बाहेरवर असणाऱ्या लोकांकडे फेकली असे करत पाच ते सहा जणांना बाहेर काढले. सर्व जणांना बेशुद्ध अवस्थेत सौरभ उत्तम कदम यांनी तातडीने जखमींना उपचारासाठी ईश्वरपूर येथील कोयना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी विशाल जाधव, सचिन चव्हाण आणि सागर माळी यांना मृत घोषित केले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महादेव कदम यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अन्य जखमींवर कोयना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
हेदेखील वाचा : Palghar News: खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून लघु उद्योजकाची आत्महत्या, गुन्हा दाखल






