ठाणे स्वच्छ आणि सुंदर राखण्यासाठी...संजय केळकर यांनी नागरिकांना केले आव्हान
ठाणे हे स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून प्रसिद्ध आहे. शहराचे सौंदर्य आणि स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी ठाणे महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील असते. मात्र ही जबाबदारी केवळ महापालिकेचीच नसून प्रत्येक नागरिकानेही त्यात सहभागी होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले. त्यांनी ठाणे महापालिकेच्या ‘शून्य कचरा आणि पर्यावरण भव्य प्रदर्शनाला’ भेट दिल्यानंतर हे मत व्यक्त केले.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका नौपाडा येथील गावदेवी मैदानात ‘उत्सव वसुंधरेचा, संकल्प हरित ठाण्याचा’ या उपक्रमांतर्गत शून्य कचरा आणि पर्यावरण विषयक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती निर्माण करणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा प्रसार करणे हा आहे. गुरुवारी सायंकाळी आमदार संजय केळकर, आयुक्त सौरभ राव, माजी नगरसेवक संजय वाघुले आणि इतर मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त शंकर पाटोळे, मधुकर बोडके, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे आदी उपस्थित होते.
Raigad Accident : शिवराज्याभिषेक सोहळ्याहून परतताना भीषण अपघात; शिवप्रेमींचं वाहन उलटलं
या वेळी सर्व मान्यवरांनी ‘माझी वसुंधरा’ शपथ घेतली. आयुक्त सौरभ राव यांनी ठाणे महापालिकेच्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ठाणे ही उष्णता कृती आराखडा राबवणारी देशातील पहिली महापालिका आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठीही आराखडा तयार करण्यात आला आहे. दररोज १४०० टन कचरा संकलित केला जातो, ज्यासाठी डायघर येथे ३५० टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प सुरू आहे. तसेच, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शाडू माती आणि मूर्ती बनवण्यासाठी जागा दिली जाते. ‘माझे घर माझा बाप्पा’ अभियान राबवले जात आहे.
‘शून्य कचरा आणि पर्यावरण प्रदर्शन २०२५’ अंतर्गत विविध दालनांमध्ये पर्यावरणपूरक मूर्ती, सजावट, सौरऊर्जा, प्लास्टिकला पर्यायी वस्तू, मलनि:सारण प्रकल्प, हवा सर्वेक्षण उपकरणे आदींचे सादरीकरण करण्यात आले आहे. यासोबतच, कचऱ्याचे व्यवस्थापन उत्तम करणाऱ्या ९ प्रभागांतील गृहसंकुलांचा गौरव करण्यात आला.
या उपक्रमात विविध कार्यशाळा, परिसंवाद देखील आयोजित करण्यात आले आहेत. ‘कचऱ्यातून कला’, ‘शाडू मातीपासून मूर्ती बनवणे’, ‘कागदी पिशव्या तयार करणे’, ‘कुंडीत रोपे लावणे’, ‘घरगुती कचरा व्यवस्थापन’, ‘शाश्वत इमारत व्यवस्थापन’ अशा विषयांवर मार्गदर्शन दिले जात आहे. हे सर्व कार्यक्रम ८ जूनपर्यंत विनामूल्य खुले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






