सिंधुदुर्ग : आज कणकवलीत आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊतांवर घणाघाती टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले की, संजय राजाराम राऊत याने आज छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महराजांच्या गादीचा अपमान कसा झाला याची मुक्ताफळे उधळली. याच संजय राजाराम राऊत यांनी छत्रपतींच्या गादीचे पुरावे मागून सर्वात मोठा अपमान केला होता. हाच संजय राऊत कोल्हापुरात छत्रपतीं ना जाऊन भेटत भगवी शाल घालतो. तेव्हा कोल्हापुरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राऊत यांना विरोध का केला नाही? संजय राऊतला कोल्हापुरात प्रवेश करू देणार नाही अशी भूमिका का घेतली नाही? असा सवाल भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केला.
संजय मंडलीक यांचा माफीनामा मागणाऱ्या कोल्हापुरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तेव्हा संजय राऊतला जाब का विचारला नाही? असा रोखठोक सवाल नितेश राणे यांनी केला. स्व. बाळासाहेब ठाकरे म्हणजे हिंदुत्वाचे ज्वलंत प्रतीक होते. तेव्हा बाळासाहेबांच्या भेटीला मातोश्रीवर जाण्यात नामदार अमित शहा यांना कमीपणा वाटत नव्हता. आज मात्र मातोश्रीने काँग्रेसचे पाय धरायला सुरुवात केली आहे. तेव्हाची शिवसेना आणि आताची हिंदुत्व विसरलेली उबाठा सेना यात जमीन आसमानचा फरक आहे. राजनाथ सिंग असो, प्रमोद महाजन आदी भाजपा नेते मातोश्रीवर बाळासाहेबांना आदराने भेटत असत. पण काँग्रेस नेता राहुल गांधी एकदा तरी मातोश्रीवर आले का? याचा विचार राऊतने करावा. संसदचा अवैध ताबा मोदींनी घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. त्याचा समाचार घेताना आमदार नितेश राणे यांनी राऊत यांची चांगलीच चिरफाड केली. मुंबई महापौर बंगला तुझा मालक स्वतःच्या ट्रस्टच्या घशात घालायला बघत होता, अशा शब्दांत भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी खा. संजय राऊत यांच्यावर घणाघात केला.