मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज मुंबईत येत आहेत. मोदींच्या हस्ते वंदे भारत ट्रेनला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे. गेल्या 21 दिवसात मोदींचा हा दुसरा मुंबई दौरा आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोदींचा दौरा होत आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून टीका केली आहे. मुंबई महापालिका निवडणुका (BMC Election) होईपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुक्काम दिल्लीऐवजी मुंबईत असू शकतो, अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.
मुंबईत मुक्कामाची शक्यता
संजय राऊत म्हणाले की, जोपर्यंत मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत नाही. मुंबई महापालिकेची तारीख ठरत नाही, तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुक्काम दिल्लीऐवजी मुंबईत राहू शकतो. ते मुंबईत घर घेऊ शकतात किंवा राजभवनात मुक्काम करू शकतात. कारण मुंबई महापालिका जिंकण्यासाठी या भाजप आणि मिंधे गटाचे लोक समर्थ नाहीत. मोदी आले काय किंवा अख्खा देश लावला काय तरीही मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना जिंकेल याची खात्री असल्याने मोदींचा पत्ता सारखा टाकला जातोय, असेही ते म्हणाले.
वंदे भारत फक्त निमित्त
राऊतांनी सांगितलं की, मला मोदींवर टीका करायची नाही. दिल्लीत संसद सुरू आहे. महत्त्वाचे विषय सुरु आहेत. याशिवाय अदानीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी घेरलेलं असताना मोदी मुंबईत येत आहेत. वंदे भारत ट्रेन फक्त एक निमित्त आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुंबई महापालिका जिंकायची आहे. हे फार महत्त्वाचं आहे. मात्र आम्हीही तयारीत आहोत, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
भाजप आणि मिंधे गट मुंबईत फेल
मोदी मुंबईत येऊन गेले. ते कर्नाटकात गेले. जिथे जिथे निवडणुका आहेत तिथे तिथे मोदी वारंवार जातात. याचा अर्थ स्थानिक भाजप नेते दुर्बल आहेत. देशाचा पंतप्रधानांचं लक्ष कुठे तर मुंबई महापालिकेवर. मोदींच्या वारंवार मुंबईत येण्यामुळे हेच स्पष्ट होतं की इथले सर्व भाजप नेते आणि मिंधे गटाचे नेते आम्हाला आव्हान देण्यात फेल आहेत. ते सक्षम नसल्यामुळे ते मोदींना बोलावत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.