संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन मस्साजोग ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन
बीड – बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. 9 डिसेंबर रोजी ही हत्या झाली असून संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात येत होता. घटनेला 20 दिवसांपेक्षा जास्त दिवस होऊन देखील आरोपींना अटक करण्यात येत नव्हती त्यामुळे मूक मोर्चा व आंदोलन देखील झाली. यानंतर आता पुन्हा एकदा मस्साजोग गावातील ग्रामस्थ संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थांनी जल आंदोलन करण्यास सुरुवात केलेली आहे.
मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टर माईंड आरोपी म्हणून वाल्मिक कराड याचे नाव समोर येत आहे. पोलीस व सीआयडीच्या प्रयत्नानंतर देखील कराडला अटक करण्यात येत नव्हती. त्यानंतर पुण्यातील पाषाण रोड सीआयडी ऑफिसला आत्मसमर्पण केले. यामुळे विरोधकांनी जोरदार टीका देखील केली. वाल्मिक कराड याने व्हिडिओ देखील जारी केल्यामुळे रोष व्यक्त केला आहे. या घटनेनंतर देखील इतर आंदोलन करण्यात आली.
महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बीडमधील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 22 दिवस उलटले आहेत. यातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत. आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आल्याने मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या फरार आरोपींना तात्काळ अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आता नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सामूहिक जलसमाधी आंदोलन करण्यात आले. यावेळी छाती एवढ्या पाण्यामध्ये ग्रामस्थांनी आंदोलन केले. यामुळे गावातील वातावरण तापले होते.
संतोष देशमुख यांच्या मारेकर्यांना आणि सर्व आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज (दि.01) सकाळीच मस्साजोगच्या ग्रामस्थांनी मस्साजोग तलावामध्ये उतरुन सामूहिक जल समाधी आंदोलन केले. या आंदोलनात गावातील महिला, लहान मुलंही सहभागी झाले होते. महिलांनी देखील पाण्यामध्ये उतरुन तपासला दिरंगाई होत असल्याचा आरोप केला आहे. यावेळी आंदोलनस्थळी पोलीस देखील आले होते. पोलिसांनी ग्रामस्थांना समजवून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
वाल्मिक कराडचे आत्मसमर्पण
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराडचे नाव समोर आले आहे. मागील 20 दिवसांपासून फरार असलेल्या वाल्मिक कराडने स्वतः येऊन आत्मसमर्पण केले. मात्र पोलिसांना व सीआयडी पथकाने शोध घेऊन देखील तो न सापडल्यामुळे रोष व्यक्त केला जात आहे. वाल्मिक कराड याच्या आत्मसमर्पणानंतर त्याची मेडिकल चाचणी करण्यात आली आहे. तसेच रात्री उशीरा याबाबत सुनावणी देखील पार पडली. यामध्ये 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचबरोबर आरोपी सुदर्शन घुले (वय वर्षे 26) याचा देखील शोध आहे. त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील त्याचे साधीदार कृष्णा आंधळे (वय वर्षे 27), सुधीर सांगाळे हे तिघेही फरार आहेत. या तिन्ही आरोपींचा शोध सुरु आहे. मात्र प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी करत जलसमाधी आंदोलन करत आहेत.